व्यावसायिक भागीदारीच्या नावाखाली महिलेची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 12:51 AM2019-06-05T00:51:15+5:302019-06-05T00:52:00+5:30
मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून महिला भागीदारांकडून रक्कम घेतल्यानंतर बनावट कागदपत्राद्वारे आरोपीने तिची भागीदारी संपुष्टात आणली. ही बनवाबनवी लक्षात आल्यानंतर फसवणूक झालेल्या महिलेने आरोपी महेंद्र दुर्योधन मेश्राम आणि त्याचा साथीदार रुपेश यादवराव मेंढे (रा. योगेश्वर नगर, दिघोरी) या दोघांविरुद्ध नंदनवन पोलिसांत फसवणुकीची तक्रार नोंदवली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून महिला भागीदारांकडून रक्कम घेतल्यानंतर बनावट कागदपत्राद्वारे आरोपीने तिची भागीदारी संपुष्टात आणली. ही बनवाबनवी लक्षात आल्यानंतर फसवणूक झालेल्या महिलेने आरोपी महेंद्र दुर्योधन मेश्राम आणि त्याचा साथीदार रुपेश यादवराव मेंढे (रा. योगेश्वर नगर, दिघोरी) या दोघांविरुद्ध नंदनवन पोलिसांत फसवणुकीची तक्रार नोंदवली.
चंद्राणी किशोर वंजारी (वय ३५) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. त्या उज्ज्वलनगर सोसायटीत राहतात. त्यांचे आरोपी नंदनवनमधील केडीके कॉलेजसमोर आरोपी महेंद्र मेश्राम मेस चालवितो. त्याने आपल्या मेसला फूड पार्सल एक्स्प्रेस असे नाव दिले आहे. आरोपी मेश्रामने वर्षभरापूर्वी चंद्राणी वंजारी यांच्याशी सलगी साधून त्यांना आपल्या व्यवसायात रक्कम गुंतविल्यास मोठा नफा मिळेल, असे सांगितले होते. ४ लाख रुपये गुंतविल्यास व्यवसायात भागीदारी देण्याचीही बतावणी केली होती. त्यानुसार, चंद्राणी यांनी मेश्रामला ३ लाख, ७८ हजारांची रक्कम देऊन भागीदारीसंबंधीचा कागदोपत्री करार केला. आरोपीने रक्कम घेतल्यानंतर २० ऑक्टोबर ते २२ आॅक्टोबर २०१८ दरम्यान रुपेश मेंढे नामक साथीदारांच्या मदतीने बनावट कागदपत्रे तयार केली. त्यावर चंद्राणी यांच्या बनावट सह्या करून त्यांची व्यावसायिक भागीदारी संपल्याचे नमूद केले. ही बाब कळताच चंद्राणी यांनी आरोपी महेंद्रला विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. व्यवसायातील नफा सोडा, तो मुद्दल रक्कमही परत करायला तयार नसल्याने महिलेने नंदनवन ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार विनायक चव्हाण यांनी तक्रारअर्जाची चौकशी करून घेतली. त्यानंतर सोमवारी या प्रकरणात गुन्हा दाखल केला. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
अनेक तक्रारी, एकीने ठाण्यात बदडले
आरोपी महेंद्र मेश्राम हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने अशा प्रकारे अनेक महिलांना लाखोंचा गंडा घातल्याची चर्चा आहे. नंदनवन ठाण्यातील काही पोलिसांना तो फूड पार्सल देतो. त्यामुळे त्याची त्यांच्यासोबत ओळख आहे. त्याचा तो गैरफायदा घेतो. त्याच्याविरुद्ध तक्रार घेऊन येणाऱ्यांना आल्यापावली परत पाठविण्यात त्याला यापूर्वी अनेकदा यश मिळवले आहे. भंडारा जिल्ह्यातील एका महिलेकडून त्याने अशाच प्रकारे लाखो रुपये हडपल्यामुळे संतप्त महिलेने त्याला काही दिवसांपूर्वी ठाण्यातच बदडले होते.
बलात्काराचाही आरोपी
महेंद्र मेश्राम याच्याकडे मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या एका निराधार महिलेला लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले होते. लग्नासोबत त्याने तिला व्यावसायिक भागीदारी देण्याचेही आमिष दाखवले होते. त्यासाठी त्याने तिचे दागिने विकून रक्कमही घेतली होती. नंतर मात्र आरोपीने तिला वाऱ्यावर सोडले. यामुळे दोन महिन्यांपूर्वी पीडित महिलेने नंदनवन ठाण्यात त्याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार नोंदवली होती. त्यावेळी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, त्या गुन्ह्यात त्याने अटकपूर्व जामीन मिळवला. आताही तो अटकपूर्व जामीन मिळवण्याच्या तयारीत असल्याचे समजते.