वंचितांच्या मदतीसाठी महिलांचा ‘हातभार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 01:20 AM2017-10-06T01:20:49+5:302017-10-06T01:21:01+5:30
अंध, गतिमंद गरीब विद्यार्थ्यांनाही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणता यावे, त्यांचेही आयुष्य सुखावह करता यावे, यासाठी जगदंबा लोकसेवा प्रतिष्ठान, कोराडी व पायोनियर्स बहुउद्देशीय संस्थेतर्फे .....
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंध, गतिमंद गरीब विद्यार्थ्यांनाही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणता यावे, त्यांचेही आयुष्य सुखावह करता यावे, यासाठी जगदंबा लोकसेवा प्रतिष्ठान, कोराडी व पायोनियर्स बहुउद्देशीय संस्थेतर्फे चिटणवीस सेंटर येथे महिला बचत गटाद्वारे निर्मित वस्तूचे तीन दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
गुरुवारी संध्याकाळी राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंचावर आ. सुधाकर कोहळे, महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, राजेश रोकडे, सिस्टर ज्योत्स्ना मेरी, जिज्ञासा चव्हाण व राम साठवणे उपस्थित होते. जगदंबा लोकसेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष ज्योती बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात आयोजित या प्रदर्शनातून गोळा होणारा निधी आत्मदीप सोसायटीच्या माध्यमातून अंध, गतिमंद मुलांच्या मदतीसाठी दिला जाणार आहे. डॉ. अरुणीमा पानसे यांनी प्रास्ताविकातून या प्रदर्शनाच्या आयोजनामागची भूमिका विशद केली. संचालन डॉ. संजय धोटे यांनी तर आभार अनुराधा अमीन यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुषमा साठवणे, राणी रोकडे यांचे सहकार्य लाभत आहे.
शीतल, पायलची सामाजिक धडपड
शीतल शहा आणि पायल मेहता दोघ्याही अगदी क्रिएटिव्ह मैत्रिणी. लोकांच्या आयुष्यात गोडवा पेरता यावा म्हणून त्यांनी अगदी ठरवून होममेड चॉकलेटचा व्यवसाय उभारला. दोघ्याही तशा सुखवस्तू कुटुंबातील. पण काहीतरी वेगळे करण्याची जिद्द त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. यातून त्यांनी नवनवीन प्रयोग करून चविष्ट चॉकलेट तयार केले. चॉकलेट पिझ्झा हा तर त्यांचा अफलातून प्रयोग आहे. अशा या शीतल, पायलनी या प्रदर्शनात स्टॉल लावला आहे. नफा हा विषयच नाही. या चॉकलेटच्या विक्रीतून वंचितांच्या आयुष्यात आनंद पेरता आला तर आम्ही स्वत:ला भाग्यवान समजू, अशा त्या सांगतात.
जसमीत, सुकन्या देताहेत मदतीचा हात
जसमीत कौर आणि सुकन्या मोहंती या दोन छंदवेड्या तरुणींचा कॉस्मेटिक्सचा व्यवसाय आहे. दोघीही आधी स्वत:साठी कॉस्मेटिक्स बनवायच्या. यातूनच त्यांना याला व्यवसायात परावर्तित करण्याची कल्पना सुचली. या प्रदर्र्शनादरम्यान त्यांना इतर ठिकाणचेही निमंत्रण होते. परंतु या प्रदर्र्शनाद्वारे वंचित विद्यार्थ्यांना मदत केली जाणार आहे, हे कळताच त्यांनी इतर सर्व निमंत्रणे नाकारून येथे स्टॉल लावला. पैसा आयुष्यात खूप कमावता येईल. परंतु आपल्या प्रयत्नाने एखाद्याचे जीवन सावरले जाणार असेल तर त्यातून मिळणारा आनंद पैशात मोजताच येणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
हे तर ईश्वरी कार्य
अंध, गतिमंद गरीब विद्यार्थी समाजाच्या मुख्य धारेपासून नकळत विभक्त होत असतात. त्यांना सन्मानाचे आयुष्य प्रदान करण्यासाठी आयोजित हे प्रदर्शन म्हणजे ईश्वरी कार्य आहे. या पुण्यकार्यासाठी मदतीचे आणखी हात समोर यायला हवे. या कामासाठी सरकारतर्फे जी काही मदत करता येईल ती नक्की करू, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.