नागपूरच्या ‘हॉटेल द लिजेंड इन’ मध्ये कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेस कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 09:51 PM2017-11-15T21:51:36+5:302017-11-15T22:01:33+5:30
सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘हॉटेल द लिजेंड इन’ मध्ये कुंटणखाना चालविणाऱ्या एका महिला आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. काझी यांच्या न्यायालयाने १ वर्ष सश्रम कारावास आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘हॉटेल द लिजेंड इन’ मध्ये कुंटणखाना चालविणाऱ्या एका महिला आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. काझी यांच्या न्यायालयाने १ वर्ष सश्रम कारावास आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
रितू अमित माडेवार (२९), असे आरोपी महिलेचे नाव असून ती यवतमाळच्या रागिणी अपार्टमेंट येथील रहिवासी आहे. या महिलेचा पती अमित अनिल माडेवार (४२) हा जामीन होताच फरार झाल्याने त्याच्याविरुद्ध वेगळा खटला चालणार आहे.
खटल्याची पार्श्वभूमी अशी की, आरोपी माडेवार दाम्पत्याने यवतमाळ येथील दोन तरुणींना कपडे विकण्याच्या व्यवसायाचे आमिष दाखवून नागपुरात आणले होते. या तरुणींना त्यांनी सोनेगाव भागातील हॉटेल द लिजेंड इनच्या खोली क्रमांक ३०९ आणि ३१४ मध्ये ठेवले होते. प्रत्यक्षात या तरुणींना त्यांनी देहव्यापारात गुंतवले होते. हे दाम्पत्य या तरुणींना गिऱ्हाईकाना उपलब्ध करून देत होते आणि मोठ्या प्रमाणावर आपला आर्थिक फायदा करून घेत होते.
१४ आॅक्टोबर २०१६ रोजी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने बनावट गिऱ्हाईक पाठविला होता. त्याच वेळी या विभागाने धाडीची कारवाई करून या दाम्पत्याला रंगेहात अटक केली होती आणि दोन्ही तरुणींची सुटका केली होती. या प्रकरणी सोनेगाव पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भादंविच्या ३७०, ३४ आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३, ४, ५, ६, ७ अन्वये गुन्हा दाखल केला होता. पोलीस निरीक्षक पी. सी. सोनवणे यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपी दाम्पत्याविरुद्ध आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. आरोपी अमित माडेवार हा जामीन मिळताच फरार झाला होता. न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊन आरोपी महिलेला ही शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील श्रीकांत गौळकर यांनी तर आरोपीच्या वतीने अॅड. राकेश कोचर यांनी काम पाहिले. हेड कॉन्स्टेबल फय्याज खान, रविकिरण भास्करवार, कॉन्स्टेबल मंगेश डवरे यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.