अमरावती, नागपूर महापालिकेत महिला आरक्षणाने बिघडले दिग्गजांचे गणित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2022 09:23 PM2022-05-31T21:23:36+5:302022-05-31T21:24:06+5:30
Nagpur News तीनसदस्यीय प्रभाग रचनेनुसार होऊ घातलेल्या नागपूर, अमरावती, अकोला महापालिकेच्या निवडणुकांसाठी आरक्षण सोडत मंगळवारी पार पडली. या सोडतीमुळे अनेक दिग्गजांसमोर प्रभाग बदलून निवडून येण्याचे आव्हान असणार आहे.
अमरावती / नागपूर : तीनसदस्यीय प्रभाग रचनेनुसार होऊ घातलेल्या नागपूर, अमरावती, अकोला महापालिकेच्या निवडणुकांसाठी आरक्षण सोडत मंगळवारी पार पडली. या सोडतीमुळे अनेक दिग्गजांसमोर प्रभाग बदलून निवडून येण्याचे आव्हान असणार आहे. ९८ सदस्यीय अमरावती महापालिकेत ४९ जागा महिलांसाठी राखीव राहील.
अमरावती महापालिकेत अनेक ठिकाणी पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी एकाच पक्षाच्या दोन मावळत्या नगरसेवकांमध्ये मोठी चुरस पाहावयास मिळणार आहे. एकूण ९८ पैकी तब्बल ३२ जागा खुल्या असून, तेथेच सर्वाधिक चुरस व स्पर्धा असेल. एकंदरीतच महिला आरक्षणाने अनेकांची समीकरणे बिघडली आहेत. ६ जूनपर्यंत महिला आरक्षण सोडतीबाबत सूचना वा हरकती नोंदविता येणार आहेत. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता एससी, एसटी व सर्वसाधारण महिलांसाठीची प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यास सुरुवात झाली. महापालिका शाळेतील बालकांच्या हस्ते ती सोडत काढली गेली; तर महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी ते आरक्षण घोषित केले. मंगळवारी एससीसाठी राखीव असलेल्या १७ जागांपैकी ९, एसटीच्या दोनपैकी एक व सर्वसाधारण संवर्गातील नऊ जागांवरील महिला आरक्षण निश्चित करण्यात आले. सोडतीसाठी उपायुक्त सुरेश पाटील, सहायक निवडणूक अधिकारी अक्षय निलंगे उपस्थित होते.
माजी महापौर तिवारींना बालपांडेंची अडचण, विरोधी पक्षनेते वनवे ‘सेफ’
नागपुरात मात्र बहुतांश नगरसेवकांना दिलासा मिळाला असून, त्यांचे प्रभाग सुरक्षित झाले आहेत. माजी महापौर दयाशंकर तिवारी व माजी नगरसेवक ॲड. संजय बालपांडे एकाच प्रभागात आल्याने नेमकी कुणाची बाजू घ्यायची, असा पेच भाजपपुढे आहे. माजी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांचा प्रभाग सुरक्षित आहे.
काही ठिकाणी एकाच पक्षाचे दोन नगरसेवक एकाच प्रभागात आल्याने त्यांना स्वपक्षातच तिकिटासाठी लढावे लागणार आहे. भाजपचे संदीप गवई, प्रमोद तभाने, अर्चना पाठक यांच्या अडचणी वाढल्या आहेत. भाजपचे माजी सत्तापक्षनेते अविनाश ठाकरे, प्रकाश भोयर, काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे, पुरुषोत्तम हजारे, सतीश होले, संदीप सहारे, मनोज सांगोळे, रमेश पुणेकर यांच्यासह राष्ट्रवादीचे गटनेते दुनेश्वर पेठे, आभा पांडे यांचाही लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कुमेरियांशी कोण भिडणार, कुकडे की झलके?
शिवसेनेचे महानगरप्रमुख, माजी उपमहापौर किशोर कुमेरिया यांचे कार्यक्षेत्र प्रभाग २९ व प्रभाग ४९ मध्ये आहे. प्रभाग २९ मध्ये परिवहन समितीचे माजी सभापती बंटी कुकडे यांचा जुना प्रभाग जोडण्यात आला आहे. तर, प्रभाग ४९ मधून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष पिंटू झलके लढण्याच्या तयारीत आहेत. या दोन्ही प्रभागांत भाजप-सेना यांच्यात तुल्यबळ लढत होणार आहे. कुमेरियांशी कोण भिडणार, याकडे लक्ष लागले आहे.
अकोला मनपात येणार महिलाराज
अकोला महापालिकेत ९१ पैकी ४६ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या असल्या, तरीही सर्वसाधारण प्रवर्गातील उर्वरित ३७ जागांवर महिलांना निवडणूक लढवता येणार असल्याने महापालिकेत महिलाराज येण्याची चिन्हे आहेत.
निवडणुकीच्या अनुषंगाने महिला प्रवर्गातून अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या १५ पैकी आठ जागा, अनुसूचित जमातीच्या दाेनपैकी एक व सर्वसाधारण प्रवर्गातील ७४ पैकी ३७ अशा एकूण ४६ जागांचे आरक्षण मंगळवारी साेडतीद्वारे जाहीर करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियाेजन भवनमध्ये महिलांसाठी ५० टक्के राखीव आरक्षणानुसार साेडत प्रक्रिया पार पडली. ९१ सदस्यांमधून महिलांसाठी आरक्षित असलेल्या ५० टक्क्यांनुसार ४६ जागांसाठी महापालिका प्रशासनाने आरक्षण जाहीर केले.