रेल्वे अंडरब्रीजसाठी महिला रुळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 02:44 AM2017-08-11T02:44:20+5:302017-08-11T02:45:14+5:30
नॅशनल हायवे क्रमांक ६९ वर तयार करण्यात येत असलेल्या मानकापूर रेल्वे अंडरब्रीजच्या कामाला विलंब होत असल्यामुळे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नॅशनल हायवे क्रमांक ६९ वर तयार करण्यात येत असलेल्या मानकापूर रेल्वे अंडरब्रीजच्या कामाला विलंब होत असल्यामुळे स्थानिक महिलांनी त्याचा विरोध करून हे काम त्वरित पूर्ण न केल्यास आमरण उपोषण करण्याचा तसेच रेल रोको करण्याचा इशारा दिला.
सन २०१५ मध्ये मानकापूर रेल्वे अंडरब्रीजच्या खाली आंदोलनकर्त्यांनी प्रदीर्घ उपोषण केले होते. या उपोषणाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट देऊन रेल्वेच्या अधिकाºयांना खडसावले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे अंडरब्रीजच्या कामात आता फक्त रेल्वे ट्रॅकच्या घाडी गडर टाकण्याचे काम शिल्लक आहे. हे काम आठ महिन्यांपासून प्रलंबित आहे. आंदोलनकर्त्यांनुसार रेल्वे रुळाखाली गडर टाकण्यासाठी रेल्वेची परवानगी बाकी आहे. त्यांच्या मते कुठे, कोणत्या स्तरावरील काम थांबले आहे हे पाहणे संबंधित विभागाची जबाबदारी आहे. काम सुरू केल्यानंतर ते मुदतीत पूर्ण करणे गरजेचे आहे. हे काम २० नोव्हेंबर २०१५ मध्ये सुरू झाले होते. ते २०१६ मध्ये पूर्ण करणे गरजेचे होते. परंतु काम कासवगतीने सुरु असल्यामुळे २०१७ पर्यंत ते पूर्ण झाले नाही. आंदोलनादरम्यान स्थानिक भाजप कार्यकर्ता शंभु सिंह, साकिब खान, पांडुरंग ठाकरे यांच्यासह किरण बावला, नीलम, आशा भागरे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
अपंगांसाठी कठीण
तिरुपतीनगर येथील रहिवासी ज्योती महाजन यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा अपंग आहे. त्याला शाळेत व ट्यूशनला जाण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडावा लागतो. रेल्वे अंडरब्रीज नसल्यामुळे त्याला आणि इतर महिलांना मोठा त्रास होत आहे.
एटीएमकडे जाण्यासाठी त्रास
कल्पना बैस, मीरा चुरागळे आणि रमावती सिंह यांनी सांगितले की, रेल्वे अंडरब्रीज तयार करण्यात जी उदासीनता दाखविण्यात येत आहे. त्यामुळे झिंगाबाई टाकळीत एटीएममधून पैसे काढण्यासाठी रुळ ओलांडावा लागत आहे. लांब फेरा घालण्यामुळे वाहनातील पेट्रोल खर्च होत आहे. सर्व्हिस रोडवरून पुलापर्यंत पोहोचण्यासाठी अधिक धोका राहतो आणि वेळही खूप लागतो. अशा स्थितीत मुलांमुळे अधिक चिंता वाटते.
या भागातील नागरिकांना आहे त्रास
४रेल्वे अंडरब्रीज नसल्यामुळे ओमनगर, ओम साई नगर, आर्य नगर, तिरुपति नगर कॉलनी, शंभू नगर, गायत्री नगर, बाबा फरीदनगर, नारा रोडकडील नागरिक त्रस्त आहेत.