जन्मठेपेच्या शिक्षेविरुद्ध महिला सर्वोच्च न्यायालयात
By admin | Published: March 7, 2016 02:46 AM2016-03-07T02:46:46+5:302016-03-07T02:46:46+5:30
एका खूनप्रकरणी झालेल्या जन्मठेपेच्या शिक्षेविरुद्ध आरोपी महिलेने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली आहे.
नागपूर : एका खूनप्रकरणी झालेल्या जन्मठेपेच्या शिक्षेविरुद्ध आरोपी महिलेने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली आहे. न्या. ए. के. सिकर आणि न्या. आर. के. अग्रवाल यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला नोटीस जारी करून ही याचिका अंतिम सुनावणीसाठी मंजूर केली आहे.
लीलाबाई सुरेश बावणे (५०), असे महिला आरोपीचे नाव असून ती वर्धा येथील रहिवासी आहे. वर्धेच्या मच्छी मार्केटमध्ये या महिलेचे दुकान होते.
व्यावसायिक वैमनस्यातून २ फेब्रुवारी २००३ रोजी लीलाबाई, तिची दोन मुले, पती आणि अन्य, अशा आठ जणांनी सत्तूर, चाकू आणि लाकडी दांड्याने हल्ला करून शंकर शिंदे याचा खून केला होता.
१३ फेब्रुवारी २०१३ रोजी वर्धा सत्र न्यायालयाने सर्व आठही जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आरोपींनी या शिक्षेला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली असता १२ डिसेंबर २०१४ रोजी लीलाबाई आणि तिचा मुलगा विजय बावणे यांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवून अन्य सहा जणांची शिक्षा रद्द करण्यात आली होती. लीलाबाईने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन या शिक्षेला आव्हान दिले आहे. न्यायालयात आरोपी महिलेच्यावतीने अॅड. राजेंद्र डागा आणि अॅड. मोहित खजांची यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)