चित्रपटातील सामना जिंकला, आयुष्याचा हरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:06 AM2021-07-05T04:06:29+5:302021-07-05T04:06:29+5:30

नागपूर : आघाडीचा अभिनेता अमिताभ बच्चन सोबत त्याला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करीत त्याने चांगली ...

Won the match in the movie, lost the life | चित्रपटातील सामना जिंकला, आयुष्याचा हरला

चित्रपटातील सामना जिंकला, आयुष्याचा हरला

Next

नागपूर : आघाडीचा अभिनेता अमिताभ बच्चन सोबत त्याला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करीत त्याने चांगली भूमिकाही वठविली. त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे संघाला फुटबॉलचा सामना जिंकता आला. परंतु आयुष्याच्या स्पर्धेत मात्र तो हरला. केवळ आपले शौक पूर्ण करण्यासाठी तो चोरीकडे वळला आणि लोहमार्ग पोलिसांच्या तावडीत सापडला.

प्रियांशु ऊर्फ बाबू रवी क्षेत्री (२०) रा. मेकोसाबाग असे त्याचे नाव आहे. त्याला फुटबॉल खेळण्याचा छंद आहे. मात्र वाईट संगतीमुळे तो व्यसनाधीन झाला. शौक पूर्ण करण्यासाठी चक्क रेल्वेत मोबाइल चोरी करू लागला. शुभम (२०) आणि सत्येंद्र अशी त्याच्या साथीदारांची नावे आहेत. प्रियांशु हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा आहे. त्याला तीन बहिणी आहेत. वडील मजुरी करतात. प्रियांशु उत्तम फुटबॉल खेळतो. उपराजधानीत पार पडलेल्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणात त्याला काम करण्याची संधी मिळाली. तब्बल दोन महिने त्याने काम केले. या चित्रपटात फुटबॉल सामन्याचे दृश्य आहे. फुटबॉल संघात त्याची मुख्य भूमिका होती. प्रियांशुच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांच्या चमूला सामना जिंकला आला. अमिताभ बच्चनसोबत प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाल्याने परिसरात त्याचे अनेक चाहते बनले होते. तो चित्रीकरणाचे अनेक किस्से मित्रांना सांगायचा. त्याला या कामाचे मानधनही मिळाले. असा कलावंत वाईट संगतीकडे वळल्याने अनेकांना दु:ख होत आहे. रेल्वेस्थानकावर गाडी येण्यापूर्वी आऊटरकडील भागात गाडीचा वेग कमी होतो. अशा वेळी प्रवासी प्रवेशद्वारावर उभे राहून मोबाइलवर बोलतात. अशा वेळी प्रियांशु आणि त्याचे साथीदार काठी मारून प्रवाशांचा मोबाइल खाली पाडायचे आणि मोबाइल घेऊन पसार व्हायचे. अटक केल्यानंतर प्रियांशु आणि त्याच्या साथीदारांकडून ११ मोबाइल जप्त करण्यात आले. तपासात त्याने आपण झुंड चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत काम केले असल्याचे सांगितल्यानंतर लोहमार्ग पोलीस आश्चर्यचकित झाले. त्यांनी ५ जुलैपर्यंत प्रियांशुची पोलीस कोठडी घेतली आहे. पुढील कारवाई पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास कानपिल्लेवार, गुन्हे शाखा यांनी केली. या प्रकरणाचा तपास पोलीस नायक संदीप धंदर करीत आहेत. चांगला कलावंत असूनही वाईट व्यसनामुळे प्रियांशु चोरीकडे वळल्यामुळे त्याच्या परिचित असलेल्या अनेकांना दु:ख झाले आहे.

.............

Web Title: Won the match in the movie, lost the life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.