आश्चर्य! आरोपीविरुद्ध एकाच गुन्ह्यात दोन खटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 11:07 AM2021-08-05T11:07:09+5:302021-08-05T11:08:30+5:30
Nagpur News आरोपीविरुद्ध एकाच गुन्ह्यात दोन खटले दाखल करण्याचा आश्चर्यकारक प्रकार बुलडाणा जिल्ह्यात घडला. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पोहचल्यानंतर दुसरा खटला अवैध ठरवून रद्द करण्यात आला.
राकेश घानोडे
नागपूर : आरोपीविरुद्ध एकाच गुन्ह्यात दोन खटले दाखल करण्याचा आश्चर्यकारक प्रकार बुलडाणा जिल्ह्यात घडला. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पोहचल्यानंतर दुसरा खटला अवैध ठरवून रद्द करण्यात आला. परंतु, या प्रकारामुळे आरोपीला नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
सचिन भंसाली असे आरोपीचे नाव असून, तो मलकापूर येथील रहिवासी आहे. २७ जानेवारी २०१४ रोजी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना भंसालीच्या पानठेल्यात बंदी असलेला गुटखा व तंबाखूजन्य इतर पदार्थ आढळून आले होते. त्यानंतर त्याच्याविरुद्ध भादंविच्या कलम १८८, २७३, ३२८ आणि अन्न सुरक्षा कायद्यातील कलम ५९ (३) अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला. तसेच, तपासानंतर प्रथमश्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. या न्यायालयाने २४ ऑगस्ट २०१५ रोजी भंसालीला ठोस पुरावे नसल्यामुळे निर्दोष मुक्त केले. तत्पूर्वी हा खटला प्रलंबित असतानाच अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी २० जानेवारी २०१५ रोजी समान प्रकरणात मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात दुसरा खटला दाखल केला. त्याची माहिती मिळाल्यानंतर भंसालीने दुसरा खटला रद्द करण्यासाठी ९ फेब्रुवारी २०१८ रोजी अर्ज दाखल केला होता. परंतु, मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने २७ फेब्रुवारी २०१९ रोजी तो अर्ज फेटाळून खटला कायम ठेवला. परिणामी, भंसालीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी कायद्यानुसार कोणत्याही आरोपीविरुद्ध एकाच गुन्ह्यात दोन खटले चालवता येत नाहीत, असा निर्णय देऊन भंसालीविरुद्धचा दुसरा खटला रद्द केला.
...असा आहे कायदा
फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम ३०० अ नुसार आरोपीविरुद्ध एकाच गुन्ह्यात दोनदा खटले चालवता येत नाहीत. उच्च न्यायालयाने हा निर्णय देताना ही तरतूद लक्षात घेतली. तसेच, भंसालीविरुद्धचा दुसरा खटला कायम ठेवल्यास या तरतुदीची पायमल्ली होईल, असे मत व्यक्त केले.