दुर्गा उत्सवात शिवरायांवरील अप्रतिम चित्रप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 10:39 PM2019-09-30T22:39:56+5:302019-09-30T22:48:34+5:30
लोकमत व राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळातर्फे लक्ष्मीनगरच्या व्हॉलिबॉल मैदानावरील दुर्गोत्सवात इस्रोच्या चांद्रयान मोहिमेचा देखावा आणि अंतराळातील ग्रहताऱ्यांमध्ये विराजमान दुर्गा मातेचे मनमोहक रूप भाविकांना आकर्षित करणारे ठरत आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकमत व राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळातर्फे लक्ष्मीनगरच्या व्हॉलिबॉल मैदानावरील दुर्गोत्सवात इस्रोच्या चांद्रयान मोहिमेचा देखावा आणि अंतराळातील ग्रहताऱ्यांमध्ये विराजमान दुर्गा मातेचे मनमोहक रूप भाविकांना आकर्षित करणारे ठरत आहे. यासोबत आणखी एक गोष्ट भाविकांचे लक्ष वेधत आहे आणि ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील अप्रतिम असे चित्रप्रदर्शन. शिवरायांचे जीवन दर्शन घडविण्यासह त्यांचे शासन कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य, पत्रव्यवहार आणि गडकिल्ल्यांची माहिती या प्रदर्शनात मांडण्यात आली आहे, जी तरुणांसाठी प्रेरणादायी व विद्यार्थ्यांसाठी माहितीपर आहे.
दुर्गोत्सवाच्या शुभारंभप्रसंगी महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याहस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. मंडळाच्या दुर्गोत्सवादरम्यान दरवर्षी तरुणांना मार्गदर्शक ठरावे यासाठी स्वातंत्र्य संग्राम सेनानी किंवा
महापुरुषांच्या जीवनावर चित्रप्रदर्शनाचे आयोजन केले जाते. यावर्षी हे प्रदर्शन छत्रपती शिवरायांना समर्पित करण्यात आले आहे. मंडळाचे सचिव आनंद कजगीकर यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन साकारले आहे. शिवबांचा जन्म, जिजाऊंचे संस्कार, बाल शिवाजीचे कौशल्य, लढाऊ मार्गदर्शन, आग्राहून सुटका, शिवराज्याभिषेक ते महाराजांच्या मृत्यूपर्यंतचे म्युरल्स रूपातील चित्र येथे बघायला मिळतात. ही म्युरल्स वेगवेगळ्या ठिकाणाहून जमा करण्यात आल्याचे आनंद यांनी सांगितले. दुसऱ्या दालनात गडकिल्ल्यांची छायाचित्र आहेत. शिवनेरी, देवगिरी, सिंधुदुर्ग, सुवर्ण दुर्ग, विजयदुर्ग, पुरंदर, तंजावार, गोपाळगड, तोरणा, प्रतापगड, सज्जनगड, राजगड आदी किल्ल्यांचे मनमोहक चित्र त्यात आहेत. यामध्ये शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या छायाचित्रांचाही समावेश आहे. तसेच विविध किल्ल्यांपर्यंत पोहचण्याची माहिती आहे. तिसऱ्या दालनात शिवरायांनी लिहिलेली दुर्मीळ अशी पत्रे, त्यांची मुद्रा, शासन व्यवस्था सांभाळताना घेतलेले निर्णय आदींच्या लिखित प्रतिकृती बघायला मिळतात. शिवरायांच्या सैन्याकडे वापरले जाणाऱ्या दुर्मीळ शस्त्रांचेही प्रदर्शन येथे लावण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे महाराजांचे शासन कौशल्य व व्यवस्थापन कौशल्याची माहिती देणारे साहित्य या प्रदर्शनात बघावयास मिळते. शिवरायांनी अतिशय कठीण प्रसंगांना सामोर जात शासन व्यवस्था उभी केली, याची प्रेरणा तरुणांनी घ्यावी म्हणून हे प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याचे आनंद कजगीकर यांनी सांगितले.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डौलाने उभे जलदुर्ग
प्रदर्शनातील आणखी एक लक्ष वेधणारा भाग म्हणजे नागपूरचे प्रसिद्ध कि ल्लेदार अतुल गुरू यांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये साकारलेले जलदुर्ग होय. सह्याद्रीच्या लांबच लांब पर्वतरांगा म्हणजे महाराष्ट्राला लाभलेली अमूल्य देणगी होय. या पर्वतरांगांना शोभून दिसतील असे जलदुर्ग शिवरायांनी बांधले होते. सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, गोवागड, गोपाळगड, कनकदुर्ग, जयगड, देवगड, सिंधुदूर्ग, किल्ले नेवती आदी किल्ल्यांच्या प्रतिकृती अतुल गुरू यांनी साकारल्या आहेत. यात त्यांनी पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरेल अशी कोकण रेल्वेची संकल्पना मांडली आहे. मुंबई ते केरळपर्यंत जवळपास ७४१ किमीचा रेल्वेमार्ग तयार झाल्यास पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय आकर्षक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यात महाराजांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडची प्रतिकृती आणि राज्यातील विविध किल्ल्यांवरील वास्तूंची प्रतिकृतीही मंगेश बारसागडे यांनी साकारली आहे.
विजय दर्डा यांनी केले कौतुक
लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनीही या चित्रप्रदर्शनाचे व जलदुर्गांचे अवलोकन केले. जलदुर्गाची कलाकृती व शिवरायांचा इतिहास उलगडणारे हे दुर्मीळ साहित्याचे प्रदर्शन अप्रतिम असल्याची भावना व्यक्त करीत त्यांनी आयोजनाचे भरभरून कौतुक केले.