क्या बात...अद्भूत, अप्रतिम, अवर्णनीय; नागपुरातील फुटाळा तलावात म्युझिकल फाऊंटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2022 09:42 PM2022-07-01T21:42:43+5:302022-07-01T21:48:38+5:30
Nagpur News नागपुरातील फुटाळा तलावात येत्या १५ अॉगस्टपासून म्युझिकल फाऊंटन सुरू होण्याची शक्यता असून, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत त्याची ‘ट्रायल’ झाली.
नागपूर : एरवी फुटाळ्याच्या चौपाटीवर सायंकाळी गर्दी असतेच. मात्र शुक्रवारची सायंकाळी नागपूरकरांसाठी विशेष ठरली. तलावातील पाण्यातून अचानक सप्तस्वर गुंजू लागले आणि काही वेळातच स्वरांच्या तलावातील पाण्याचा अक्षरश: थुई-थुई नाच सुरू झाला. रंगसंगतीमुळे तलावात इंद्रधनुष्याचाचा भास होत होता. अचानक पाण्यासोबत येणारे आगीचे लोट अन् तयार होणारी पाण्याची अप्रतिम ‘स्क्रीन’. प्रत्येक क्षण अंगावर रोमांच उभे करणारा होता अन् उपस्थितांच्या तोंडातून शब्द बाहेर पडत होते...अद्भूत, अवर्णनीय अन् अप्रतिम.
फुटाळा येथील म्युझिकल फाऊंटन व लाईट शो प्रकल्पाची शुक्रवारी ‘ट्रायल’ झाली. या प्रकल्पाचे लायटिंग व हार्डवेअरचे ‘इन्स्टॉलेशन’ पूर्ण झाले आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ही ‘ट्रायल’ झाली. यावेळी या प्रकल्पाशी जुळलेले देश-विदेशातील अधिकारी, तज्ज्ञ उपस्थित होते.
१५ ऑगस्टला नागपूरकरांना मिळणार भेट
सद्यस्थितीत या फाऊंटनचे हार्डवेअरचे काम पूर्ण झाले आहे. आता साऊंडसोबत पाण्याला ‘सिंक्रोनाईज’ करणे तसेच प्रोजेक्टरचे काम युद्धपातळीवर करण्यात येणार आहे. १५ ऑगस्टपर्यंत हे ‘म्युझिकल फाऊंटन’ सुरू करण्याचा प्रशासनाचा मानस असून त्यादृष्टीने आमचेदेखील प्रयत्न सुरू असल्याचे यावर काम करणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्री रेवती यांनी स्पष्ट केले. देशातील हे पहिले म्युझिकल फाऊंटन ठरणार असून जगातील सर्वात उंच जाणारे म्युझिकल फाऊंटन असल्याचा दावा रेवती यांनी केला आहे.
पाण्याच्या स्क्रीनवर अवतरणार नागपूरचा इतिहास
‘म्युझिकल फाऊंटन’चा प्रत्येक ‘शो’ ३४ मिनिटांचा राहणार आहे. पाण्याच्या रंगीबेरंगी स्क्रीनवर नागपूरचा इतिहास प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखविण्यात येणार आहे. त्याची कॉमेंट्री अमिताभ बच्चन (इंग्रजी), गुलजार (हिंदी) व नाना पाटेकर (मराठी) यांनी केली आहे. याला ए.आर.रहमान यांचे संगीत राहणार आहे, तर ऑस्कर विजेते साऊंड डिझायनर रेसूल पोकुट्टी यांनी साऊंड डिझाईन केले आहे. स्पीकरवरून येणारा आवाज आंतरराष्ट्रीय दर्जाचा असावा, यावर भर देण्यात आला आहे. ४ जुलैपासून दररोज रात्री प्रोग्रामिंग करण्यात येईल.
१८० मीटर्स लांबीचे कारंजे
या प्रकल्पात कारंज्याच्या हार्डवेअरची एकूण लांबी १८० मीटर्स इतकी आहे. जगात इतके मोठे कारंजे कुठेही नाहीत. पाण्याचा फवारा ५० मीटर इंच जाऊ शकतो व ही उंचीदेखील जगात कुठेही गाठता आलेली नाही.
असा आहे प्रकल्प
- ‘म्युझिकल फाऊंटन’च्या ‘गॅलरी’त चार हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था
- मागील बाजूस १२ माळ्यांची इमारत. अकराशे वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था.
- इमारतीत फूटपार्क, मॉल राहणार. अकराव्या माळ्यावर मल्टिप्लेक्स राहणार.
- इमारतीच्या बाराव्या मजल्यावर फिरते रेस्टॉरंट उभारणार.
- दोन मेगावॅट वीज लागणार, सौरऊर्जेचा ‘पॉवर’ देण्याचा प्रयत्न.
- १८० मीटर्सचे ‘फ्लोटिंग फाऊंटन’
- हार्डवेअरचे बहुतांश काम नागपूरकर तज्ज्ञांकडूनच पूर्ण
- बॉटनिकल गार्डनमध्ये समुद्राप्रमाणे चौपाटी उभारणार.
- तेथील फ्लॉवर गार्डनमध्ये देशभरातील गुलाबाची फुले राहतील. शिवाय बर्ड पार्कदेखील असेल.
- तेलंगखेडी बगिचाचे सौंदर्यीकरण व लँडस्केपिंग करणार. तेथूनही म्युझिकल फाऊंटनसाठी ‘एन्ट्री’ असेल.
- नागपूर मेट्रो, एनआयटीकडे जबाबदारी, भविष्यात मेन्टेनन्सची जबाबदारी खासगी ऑपरेटरकडे देणार.