वन विभागातर्फे लाकडांचा ई-लिलाव
By admin | Published: March 11, 2016 03:15 AM2016-03-11T03:15:22+5:302016-03-11T03:15:22+5:30
वन विभागाने आपल्या डेपोतील लाकडांच्या लिलावासाठी ‘ई-लिलाव पोर्टल’ तयार केले आहे.
विक्रीसाठी पोर्टल : बल्लारशा डेपोतून शुभारंभ
नागपूर : वन विभागाने आपल्या डेपोतील लाकडांच्या लिलावासाठी ‘ई-लिलाव पोर्टल’ तयार केले आहे. विशेष म्हणजे, हा देशभरातील पहिला प्रयोग असून, वन विभागाने या ई-लिलाव पद्घतीचा अलीकडेच बल्लारशा येथील डेपोतून शुभारंभ केला असल्याची माहिती वन विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. के. सिन्हा यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले, वन विभागातील लाकडांच्या लिलाव प्रक्रियेत अधिकाधिक लोकांना सहभागी होता यावे, या हेतूने ही पद्घती सुरू करण्यात आली आहे. यात लोकांना देश-विदेशात कुठेही बसून वन विभागातील लाकडांची आॅनलाईन खरेदी करता येणार आहे. मात्र या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सुरुवातीला प्रत्येकाला आपली नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तीला एक सांकेतिक क्रमांक दिला जाईल. शिवाय खरेदी व्यवहारासाठी ईएमडी रक्कम जमा करावी लागेल. यानंतर ती व्यक्ती थेट लिलाव प्रक्रि येत सहभागी होईल. वन विभागाने पहिल्या टप्प्यात बल्लारशा येथे हा ई-लिलाव सुरू केला असून, यानंतर परतवाडा व यवतमाळ येथील जोडमोहा डेपोतसुद्घा ही पद्घती सुरू करण्याचा मानस असल्याचे सिन्हा यांनी सांगितले. सध्या बल्लारशा येथील लिलावासाठी प्रत्येक महिन्यातील १६ व १७ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. या दोन्ही दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत हा ई-लिलाव चालणार आहे. या पद्घतीमुळे लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता येणार असून, वन विभागाच्या तिजोरीतील महसूल वाढणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
बल्लारशा डेपोतून १०० कोटींची विक्री
वन विभागाला लाकूड विक्रीतून दरवर्षी मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. यात एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा येथील डेपोतून वर्षाला शंभर कोटींपेक्षा अधिकची विक्री होत असल्याचे यावेळी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक बी. पी. सिंग यांनी सांगितले. तसेच परतवाडा येथे ४० ते ५० कोटी व यवतमाळ जिल्ह्यातील जोडमोहा येथे १० कोटीपर्यंतची विक्री होत असल्याचेही ते म्हणाले.