धर्मनिरपेक्षता, सांप्रदायिकता शब्दाचा उपयोग निव्वळ राजकीय हितापुरताच : कुमार बिश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 12:02 AM2019-09-11T00:02:17+5:302019-09-11T00:04:52+5:30
मागील ७० वर्षात धर्मनिरपेक्षता आणि सांप्रदायिकता या दोन शब्दांचा उपयोग लोकशाहीमध्ये राजकारण्यांनी हवा तेव्हा आणि हवा तसा गरजेप्रमाणे केला, असा आरोप डॉ. कुमार विश्वास यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील ७० वर्षात धर्मनिरपेक्षता आणि सांप्रदायिकता या दोन शब्दांचा उपयोग लोकशाहीमध्ये राजकारण्यांनी हवा तेव्हा आणि हवा तसा गरजेप्रमाणे केला, असा आरोप डॉ. कुमार विश्वास यांनी केला.
नागपुरातील एका गणेशोत्सव मंडळाच्यावतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ‘धर्मनिरपेक्षता विरुद्ध सांप्रदायिकता’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. ते म्हणाले, देश एकदा पंथनिरपेक्ष होईल, मात्र धर्मनिरपेक्ष कधीच होऊ शकत नाही. कारण धर्म ही प्रत्येकाची धारणा आहे. सकाळी उठल्यापासूनच्या सर्व क्रिया त्या योगानेच होत असल्याने कुणीही धर्मापासून दूर राहू शकत नाही. धर्मनिरपेक्षता या शब्दाचा दुरुपयोग झाला. धर्म काय आहे हे सांगताना ते म्हणाले, ‘धर्माे धार्यती प्रजा’ अर्थात प्रजा धारण करते, तो धर्म. ‘एको मी बहुस्याम’ अर्थात मी एक असलो तरी अनेक होऊ इच्छितो, ही प्रजेची धारणा असते. म्हणूनच एकाचे अनेक होणे हे धर्म जाणतो.
सांप्रदायिकतेबद्दल बोलताना ते म्हणाले, धर्मनिरपेक्षतेसोबतच या शब्दाला महत्त्व आहे. दुसऱ्याच्या जगण्यासाठी जागा निर्माण करण्याची शिकवण प्रत्येक धर्माने दिली आहे. हजरत हसन हुसेन यांच्या बलिदानाची आठवण करून ते म्हणाले, ‘लकुम दीनकुम वलियदीन’ असे हजरत पैगंबरांनी सांगितले. अर्थात स्वत:च्या जगण्यासोबत दुसऱ्यांचा मार्ग प्रशस्त करा. धर्म जगण्यातील ही लवचिकता सांगतो. दुर्गुणांचे दमन करा, असे सर्वच धर्मात सांगितले आहे. दुसºयांना मारा असे कोणताच धर्म सांगत नाही. मात्र चुकीच्या धार्मिक मानसिकता माणसांचाच नाश करतात.
धर्मनिरपेक्षता व सांप्रदायिकता या दोन शब्दासोबतच राष्ट्रवाद या शब्दाचाही आपल्या नेत्यांनी हवा तसा मोडून-तोडून वापर केला. जनतेला पद्धतशीरपणे मूर्ख बनवून नेते स्वत: मोठे होत गेले, त्यांच्या अवास्तव रंगविल्या जाणाऱ्या प्रतिमांमुळे देश लहान ठरत गेला.
डॉ. बिश्वास म्हणाले, धर्म मानायचाच असेल तर भारत हा स्वत:चा धर्म माना. कृष्ण-रामाला आपल्या स्वार्थानुसार रंगविण्यापेक्षा दुर्जनांचे पतन करणारा, सज्जनांना तारणारा, भरसभेत दुष्ट कंसमामाचा वध करणारा, कालियामर्दन करणारा,मर्यादांचे पालन करणारा दाखवा. अलिकडच्या चित्रपट, मालिकांमधून आम्ही काय बोध घेतो, याचा विचार करा. अराजकता मान्य होण्यासाठी मूठभर माणसे आपल्या मनावर चुकीचे बिंबवित असतील, तर जागे व्हा, असे आवाहन त्यांनी के ले.
‘तो’ खांदा १२५ कोटीभारतीय जनतेचा
कुमार बिश्वास म्हणाले, चांद्रयान-२ मिशन संदर्भातील अलिकडील घडामोडीत पंतप्रधान मोदी इस्रोमधील शस्त्रज्ञांना भेटले. एका भावूक क्षणी शास्त्रज्ञ डॉ. के. सिवन मोदींच्या खांद्यावर मान ठेऊन रडले. खांदा अश्रूंनी भिजला. त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या. मात्र तो खांदा भाजपाच्या नरेंद्र मोदींचा नव्हता, एका पंतप्रधानांचाही नव्हता, तर १२५ कोटी देशवासीयांचा होता. हे सर्व भारतीय शास्त्रज्ञांच्या पाठीशी आहेत, हा संदेश त्यात होता. पंतप्रधान राजीव गांधी श्रीलंका दौऱ्यावर असताना एका सैनिकाने त्यांच्या खांद्यावर बंदुकीच्या दस्त्याने हल्ला केल्याचीही आठवण बिश्वास यांनी सांगितली. या घटनेनंतर सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग त्यांना भेटायला गेले होते. पत्रकारांनी त्यांना याबद्दल विचारले असता त्यांचे उत्तर होते, मी राजीव गांधींचा खांदा पहायला नव्हे, तर १०० कोटी जनतेचा खांदा पाहायला चाललो.