अन् त्यांना बाबासाहेबांच्या कार्यातच बुद्ध गवसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 11:44 AM2018-08-30T11:44:42+5:302018-08-30T11:46:58+5:30
आनंद डेकाटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जपानसारख्या प्रगत देशातून एक तरुण बौद्ध भिक्खू बुद्ध अन् नागार्जुनाच्या कर्मभूमीच्या शोधात भारतात आले. नागार्जुनाच्या भूमीचा शोध घेत घेत ते नागपुरात पोहोचले. ना कुणाची ओळख ना पाळख, जपानी भाषा सोडली तर इतर कुठल्याही भाषेचा गंध नव्हता. अशा परिस्थितीत ते येथील भूमीशी, लोकांशी एकरूप झाले. यात कित्येक वर्षे गेली. दरम्यान, नागपुरातच त्यांना नागार्जुनाची भूमी तर गवसलीच, पण महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजून घेत असताना त्यांच्या कार्यात तथागत बुद्धही गवसले आणि ते येथेच स्थाायिक झाले. जपान सोडून नागपूर आणि पर्यायाने भारत हीच त्यांची कर्मभूमी बनली.
ते तरुण भंतेजी म्हणजे भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई होत. आज त्यांना कुठल्याही परिचयाची गरज नाही. भारतात येऊन त्यांना ५० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. त्यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त लोकमतने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांना प्रचंड ताप असूनही त्यांनी मनमोकळी चर्चा केली.
भारताचे दर्शन घेण्यासाठी ८ आॅगस्ट १९६७ रोजी ते भारतात आले. बौद्ध शांतिस्तुपाचे प्रवर्तक फुजी गुरुजी राजगिरी येथे रत्नागिरी पहाडावर शांतिस्तुपाच्या उभारणीत व्यस्त होते. ते राजगिरीला पोहोचले. भंते ससाई यांच्यानुसार, राजगिरीच्या पर्वतावरील एका दगडावर बसून ध्यानमग्न अवस्थेत असताना त्यांना आचार्य नागार्जुन यांनी दृष्टांत दिला. तसेच नागपूरला जाऊन लोकांची सेवा करण्यास सांगितले. ही गोष्ट भंते ससाई यांनी फुजी गुरुजींचे शिष्य भंते याकिझी यांना सांगितली. त्यापूर्वी नागपूर शहराचे नाव त्यांनी कधीच ऐकले नव्हते. याकिझी यांनी भारताचा नकाशा मागविला. त्यात नागपूर शहर शोधले. त्याच दिवशी भंते ससाई यांनी जपानला जाण्याचे तिकीट रद्द केले आणि नागपूरला यायला निघाले. नागपूर रेल्वे स्टेशनवर पोहोचले तेव्हा हे शहर त्यांच्यासाठी एकदम नवीन होते. ड्रम वाजवीत ते रेल्वे स्टेशनवरून निघाले. सर्व त्यांना कुतूहलाने पाहू लागले. आज तीच अनोळखी व्यक्ती नागपूरची ओळख बनली आहे. नागपूरच्या आसपासचा परिसर हा बौद्धकालीन परिसर म्हणून विख्यात होता. परंतु काळाच्या ओघात तो दडला. भंते सुरेई ससाई यांनी त्याचा अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांनी सरकारच्या मदतीविना मनसर येथे उत्खनन केले. येथेच त्यांना आचार्य नागार्जुनाची कर्मभूमीही सापडली. आज मनसरचे उत्खनन जगभरात प्रसिद्ध आहे. त्यांनी या ठिकाणी केलेल्या कामामुळे नागपूर रामटेक मनसर परिसर बौद्ध पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाले आहे.
महाबोधी महाविहार मुक्तीचा लढा सुरूच राहणार
बुद्धगया येथील महाबोधी महाविहारचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात असावे, यासाठी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. महाबोधी महाविहार मुक्तीचा हा लढा शेवटपर्यंत सुरूच राहील, असा संकल्प भंते ससाई यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवलाय.
तेव्हापासून ‘जय भीम’ हेच जीवन बनले
धम्मचक्र प्रवर्तनाचा दिवस होता. सायंकाळी दीक्षाभूमीवर मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळपासून नागपूरचे संपूर्ण रस्ते जणू दीक्षाभूमीकडेच निघाले होते. लोकांचा तो जनसागर पाहून भंते ससार्इंना मोठे कुतूहल वाटले. तेही त्यांच्यासोबत दीक्षाभूमीवर पोहचले. व्यासपीठावर अनेक मान्यवर मंडळी बसली होती. ती अगदी अनोळखी होते. लोकही एका विदेशी भिक्खूला पाहून आश्चर्य करीत होते. भंते आनंद कौसल्यायन यांनी त्यांना वर बोलावले. शेवटच्या रांगेत ते बसले. कार्यक्रम संपला. सर्व नेते व लोक उठून जाऊ लागले. त्यांना काहीच समजले नाही. कोण काय म्हणत होते, हेही समजले नाही. परंतु प्रत्येकाच्या भाषणातून एक शब्द वारंवार येत होता तो म्हणजे ‘जय भीम’. भंते ससाई यांनी माईक हाती घेतला आणि मोठ्या आवाजात जय भीम म्हणाले. त्यांचा आवाज पहाडी होता. दूरपर्यंत आवाज गेल्याने लोक जागीच थांबले. नेतेही वळून पाहू लागले. भंते ससाई पुन्हा पुन्हा जय भीम जय भीम अशा घोषणा देऊ लागले. असे जवळपास दहावेळा म्हटल्यावर लोकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. तेच भंते ससाई यांचे पहिले जाहीर भाषण ठरले. तेव्हापासून जय भीमचा मंत्र त्यांनी अवलंबिला. जय भीम हेच त्यांचे जीवन बनले. आज तेच भंते ससाई दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्षपद भूषवीत आहेत.