पाचशे किलो बारूद-वातींमध्ये सुरू होते काम, स्फोटामागे अपघात की घातपात ?
By योगेश पांडे | Published: June 13, 2024 11:45 PM2024-06-13T23:45:49+5:302024-06-13T23:45:57+5:30
स्फोटाचे कारण अस्पष्टच : कामगारांवरच फोडणार का स्फोटाचे खापर ?
नागपूर : धामना येथील चामुंडी एक्स्प्लोसिव्ह प्रा.लि. या कंपनीत स्फोट झाल्यानंतर याच्या कारणाबाबत विविध कयास वर्तविण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळी स्फोट झाला त्यावेळी केवळ शिकावू कामगार व महिलाच युनिटच्या आत कामाला होते. जवळपास पाचशे किलो बारूद व वातींमध्ये काम करत असताना आवश्यक ती सुरक्षाव्यवस्था नसल्याचाच फटका निष्पाप कामगारांना बसला. अशा स्थितीत स्फोटासाठी कुणाला नेमके जबाबदार ठरविणार की सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटाप्रमाणे कामगारांचीच चूक असल्याचा ठपका ठेवण्यात येणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘लोकमत’ने या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. या कंपनीचे कार्यालय नागपुरातील लक्ष्मीनगरात आहे. १९८६ साली या कंपनीची स्थापना झाली होती व प्रामुख्याने फटाक्यांसाठी लागणाऱ्या वाती, सेफ्टी फ्युजेस बनविण्याचे काम या कंपनीकडून करण्यात येते. या कामासाठी आजुबाजुच्या गावांमधीलच तरुण व महिलांना कामावर ठेवण्यात आले होते. येथील पॅकिंग युनिटमध्ये बारूद ठेवण्यात येत होती व त्या माध्यमातून वाती तयार करण्याचे काम चालायचे. यातील बहुतांश काम मशीनच्या मदतीनेच चालत होते. दिवसभरात दोन शिफ्टमध्ये मागील बऱ्याच कालावधीपासून हे काम सुरू होते. गुरुवारी दुपारच्या सुमारास नऊ कामगार आत असताना अचानक स्पार्क झाला व त्यामुळे पूर्ण बारूद तसेच वातींनी क्षणार्धात पेट घेतला. स्फोटाची तीव्रता फार जास्त होती व त्यामुळे कामगारांना हलण्याचादेखील वेळ मिळाला नाही. हा स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे तंत्रज्ञांनादेखील सांगणे शक्य झालेले नाही.
आरोपी बनविणार तरी कुणाला ?
पोलिसांकडून सायंकाळपर्यंत या प्रकरणात घटनास्थळावरील तणाव हाताळण्यावरच भर देण्यात येत होता. या प्रकरणात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणत: अशा अपघातांमध्ये कामगारांनीच निष्काळजीपणा दाखविला असे खापर फोडण्याचा कंपन्यांचा प्रयत्न असतो. डिसेंबर २०२३ मध्ये सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या भीषण स्फोटानंतरदेखील दाखल झालेल्या गुन्ह्यात अशीच नोंद होती. आता चामुंडी एक्स्प्लोसिव्हमध्ये झालेल्या स्फोटात निष्काळजीपणा कुणी दाखविला हा मोठा प्रश्न पोलीस व इतर तपास यंत्रणांसमोर आहे. ‘क्रिमिनल लायबिलिटी’ आणि ‘सेफ्टी प्राेटाेकाॅल’ विचारात घेता या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
कंपनीचा दावा, नियमित मॉकड्रील
दरम्यान, या प्रकरणात कंपनीच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला माहिती दिली. कंपनीतदेखील सुरक्षेच्या बाबींवर भर देण्यात येत होता व नियमित पद्धतीने सुरक्षेचे ऑडिटदेखील करण्यात येत होते. दर महिन्यात मॉकड्रीलदेखील होत होती असा दावा संबंधित अधिकाऱ्याने केला आहे. जर इतके उपाय करण्यात आले होते ,तर अशा स्थितीतदेखील रविवारी स्फोट झाल्याने विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.
फॉरेन्सिक तपासणीवरच भिस्त
या स्फोटामागे नेमके काय कारण आहे हे सध्या सांगणे शक्यच नाही. मात्र तेथील लहान लहान बाबी तसेच पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञ पोहोचले होते. त्यांच्या तपासणीवर बरेच काही अवलंबून राहणार आहे.