नागपुरात शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2023 08:37 PM2023-03-14T20:37:05+5:302023-03-14T20:37:35+5:30
Nagpur News राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वात विविध संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे मंगळवारी नागपूर शहरातील शासकीय कार्यालये, महापालिका, जिल्हा परिषदेतील कामकाज ठप्प झाले होते.
नागपूर : कर्मचाऱ्यांना अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासह अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वात विविध संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे मंगळवारी नागपूर शहरातील शासकीय कार्यालये, महापालिका, जिल्हा परिषदेतील कामकाज ठप्प झाले होते. हजारो कर्मचाऱ्यांनी संविधान चौकात धरणे आंदोलन करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी जोरदार निदर्शने केली.
शासकीय कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. या संपात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राष्ट्रीय नागपूर काॅर्पोरेशन एम्प्लाॅइज असोसिएशन (इंटक), महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महासंघ, महाराष्ट्र राज्य गट चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघ यांच्यासह विविध संघटनांचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. संपावर तोडगा न निघाल्यास बुधवारीसुद्धा शासकीय कार्यालये, महापालिका व जिल्हा परिषदेतील कामकाज ठप्प राहणार आहे. कोषागार व उपकोषागार कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी संपात उतरल्याने ऐन मार्चमध्ये जिल्ह्यातील सर्व शासकीय आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. शासकीय विभागांना निधी वितरित केला जातो. ३१ मार्चपूर्वी कोट्यवधींचा निधी खर्च करण्याची घाई केली जात असताना संपामुळे हे वितरण थांबले आहे.