दीक्षाभूमीवरील ‘धम्मसंदेश’ म्हणजे राष्ट्रनिर्माणाचे कार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 08:40 PM2018-02-07T20:40:28+5:302018-02-07T20:42:40+5:30
दीक्षाभूमीवरील धम्मसंदेश अभियान हे खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्माणाचे कार्य होय, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे यांनी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशाला एकसंध करायचे असेल तर जाती जोडण्यापेक्षा माणसं जोडणं महत्त्वाचं आहे. हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा त्यांना समतेचे विचार समजतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हेच समतेचे विचार दिले आहेत. संविधानाच्या पानापानावर हे विचार अधोरेखित झालेले आहेत. दीक्षाभूमीवरील ‘धम्मसंदेश-मैत्री व करुणेचा’ हे अभियान नेमके हेच विचार विद्यार्थ्यांमध्ये पेरण्याचे कार्य करतात. तेव्हाच ‘मी प्रथम भारतीय आणि शेवटीही भारतीय’ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजते. त्यामुळे दीक्षाभूमीवरील धम्मसंदेश अभियान हे खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्माणाचे कार्य होय, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे यांनी येथे केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभाग, धम्मसंदेश अभियान संघ आणि बानाई यांच्या सहकार्याने विविध महविद्यालयातील विद्यार्थ्यांतर्फे दीक्षाभूमीवर ‘धम्मसंदेश मैत्री व करुणेचा’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत पथनाट्यांद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य विद्यार्थ्यांनी केले. या अभिनव उपक्रमात सहभागी ३०० विद्यार्थी, प्राध्यापक आणि अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचे जाहीर अभिनंदन करण्यात आले. तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय सिव्हिल लाईन्स येथे आयोजित या समरंभाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. आगलावे बोलत होते. यावेळी समाजकल्याण विभागाचे विभागीय उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) नीलेश भरणे, डॉ. रमेश शंभरकर, प्रशांत तांबे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी नीलेश भरणे यांनी धम्मसंदेश या अभियानाचे कौतुक केले. समाजासाठी काही करायचे आहे असे अनेक जण बोलतात, पण कृती करताना मात्र फार कमी जण असतात. धम्मसंदेश अशीच कृती करणाऱ्यांचे अभियान आहे.
संचालन अरुणा गजभिये यांनी केले. अंकित राऊत यांनी आभार मानले.
संविधान लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य
डॉ. सिद्धार्थ गायकवाड यावेळी म्हणाले, धम्मसंदेश हा समाजनिर्मिती व राष्ट्रनिर्माणासोबतच व्यक्तिमत्त्व विकासाचेही कार्य करतो. खरे संविधान काय आहे? हे लोकांपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत खरी लोकशाही प्रस्थापित होऊ शकत नाही. धम्मसंदेशाच्या माध्यमातून लोकांपर्यंत संविधान पोहोचविण्याचे कार्य केले जाते.