चिपळूण बसस्थानकाचे काम सहा वर्षे रखडले, आमदार शेखर निकम यांनी सभागृहाचे लक्ष वेधले
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: December 20, 2024 16:19 IST2024-12-20T16:18:36+5:302024-12-20T16:19:32+5:30
नागपूर : रत्नागिरी जिल्ह्यातील मध्यवर्ती चिपळूण बसस्थानकाचे काम गेल्या सहा वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून याकडे ...

चिपळूण बसस्थानकाचे काम सहा वर्षे रखडले, आमदार शेखर निकम यांनी सभागृहाचे लक्ष वेधले
नागपूर : रत्नागिरी जिल्ह्यातील मध्यवर्ती चिपळूण बसस्थानकाचे काम गेल्या सहा वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून याकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी चिपळूण मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.
आमदार शेखर निकम यांनी परिवहन विभागातील चर्चे दरम्यान औचित्याचा मुद्दा मांडून चिपळूण आगाराची व्यथा सभागृहात उघड केली. आमदार निकम म्हणाले, चिपळूण मध्यवर्ती बसस्थानक इमारत नुतनीकरणाचे काम मे २०१८ पासून सुरू करण्यात आले आहे. परंतु आता सहा वर्षे होत आली तरी अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील हे महत्वाचे बसस्थानक असूनही शासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने नाराजी पसरली आहे.
बसस्थानकाचा कारभार पत्र्याच्या शेडखाली
नव्याने हायटेक पद्धतीने बांधत असलेल्या या इमारतीच्या कामाला सहा वर्षे पूर्ण होत आली तरी अद्याप पायाभरणीचे काम पूर्ण झालेले नाही हे दुर्भाग्य आहे. गेली सहा वर्षे बसस्थानकाचा कारभार पत्र्याच्या शेडखाली सुरू आहे. पावसाळ्यात तर बसस्थानकाची अवस्था आणखीनच बिकट होते.
केवळ आठ इंच बांधकाम
बसस्थानकाच्या मुख्य इमारतीचे बांधकाम जमिनीपासून केवळ आठ इंच झाले आहे. प्रवाशांना, विद्यार्थ्यांना उभे राहण्यासाठी जागा नाही. आवारात इतर सोयी सुविधा नाहीत. हा प्रश्न अध्याप प्रलंबित आहे. यामध्ये तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.
नवीन बसेस उपलब्ध व्हाव्यात
आमदार निकम म्हणाले, चिपळूण आगारात बसेसची कमतरता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक बसफेरया एसटी प्रशासनास रद्द कराव्या लागतात. राज्य परिवहन महामंडळास नवीन बसेस प्राप्त होणार आहेत. यातील काही आवश्यक बसेस रत्नागिरी विभाग प्राधान्याने चिपळूण व संगमेश्वर आगारास उपलब्ध करून दिल्यास प्रवाशांचे होणारे हाल कमी होतील. याबाबत शासन स्तरावर सकारात्मक निर्णय घ्यावा.