गुगलच्या जगात शाश्वत विकासावर काम करा; कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी
By आनंद डेकाटे | Published: January 22, 2024 06:27 PM2024-01-22T18:27:21+5:302024-01-22T18:27:34+5:30
ग्रंथपालांनी गुगलच्या जगात शाश्वत विकासावर कार्य करावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी केले. '
नागपूर : ग्रंथपालांनी गुगलच्या जगात शाश्वत विकासावर कार्य करावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी केले. 'भारतीय ज्ञान प्रणालीचे जतन व एनईपी २०२० नुसार ग्रंथालयांच्या भविष्यांची रचना करणे' या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे ज्ञान स्त्रोत केंद्र आणि ग्रंथालय भारती नागपूर महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरातील डॉ. ए. के. डोरले सभागृहात पार पडलेल्या परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात डॉ. चौधरी मार्गदर्शन करीत होते. याप्रसंगी प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ राजू हिवसे, ग्रंथालय भारतीचे अध्यक्ष डॉ. राजशेखर बालकर, शिक्षण मंच अध्यक्ष डॉ. कल्पना पांडे प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी उस्मानिया विद्यापीठ हैदराबादचे ग्रंथपाल डॉ. ए. एस. चक्रवर्ती यांनी बीजभाषण करताना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० बाबत माहिती दिली. ग्रंथालयामध्ये उपयोगात येणारे विविध तांत्रिक साधने डिजिटल (एनडीसीएल, ई-रिसोर्स, इनफ्लिबनेट) सेवांची माहिती दिली. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तांत्रिक व डिजिटल सेवांना मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रंथालय क्षेत्रातील समस्या, आव्हाने आणि ग्रंथपालांच्या भूमिका तसेच जबाबदाऱ्या पुन्हा परिभाषित करून या समस्यांचे निराकरण करण्याच्या मार्गांवरही चर्चा केली. प्रास्ताविक डॉ. विजय खंडाळ यांनी केले. संचालन डॉ. मंजू दुबे यांनी केले तर आभार डॉ. विनय पंडे यांनी मानले.
- जीवन गौरव पुरस्काराने सन्मान
ग्रंथालयाशी संबंधित संपूर्ण आयुष्य देत कार्य करणारे डॉ. दत्तात्रय देशपांडे आणि डॉ. राजशेखर बालेकर यांचा या कार्यक्रमात जीवनगौरव पुरस्कार देत सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये त्यांच्या सन्मानपत्राचे वाचन करण्यात आले. सोबतच राष्ट्रीय परिषदेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेली स्मरणिका आणि प्राप्त झालेले संशोधन लेखन प्रकाशित करण्यात आले.