नागपूर जिल्हा न्यायालयात आजपासून एक सत्रात काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 12:06 AM2020-06-19T00:06:22+5:302020-06-19T00:08:03+5:30
जिल्हा व सत्र न्यायालय आणि या न्यायालयाच्या अधिपत्याखालील इतर न्यायालयात (नागपूरमधील) १९ ते ३० जूनपर्यंत दुपारी २ ते सायंकाळी ५ या केवळ एक सत्रामध्ये कामकाज केले जाईल. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. मेहरे यांनी गुरुवारी यासंदर्भात परिपत्रक जारी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा व सत्र न्यायालय आणि या न्यायालयाच्या अधिपत्याखालील इतर न्यायालयात (नागपूरमधील) १९ ते ३० जूनपर्यंत दुपारी २ ते सायंकाळी ५ या केवळ एक सत्रामध्ये कामकाज केले जाईल. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. मेहरे यांनी गुरुवारी यासंदर्भात परिपत्रक जारी केले.
न्यायिक अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त कामकाज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करावे व त्याकरिता वकिलांना प्रोत्साहन द्यावे, असे निर्देश या परिपत्रकात देण्यात आले आहेत. न्यायपीठांची पोलीस ठाण्यानुसार विभागणी करण्यात आली आहे. एका न्यायिक अधिकाऱ्याने प्रकरण ऐकल्यानंतर ते प्रकरण दुसऱ्या न्यायिक अधिकाऱ्याकडे वर्ग करण्यात येऊ नये. सुरुवातीला प्रकरण ऐकलेल्या न्यायिक अधिकाऱ्यानेच आवश्यक आदेश द्यावा. प्रकरण वारंवार सुनावणीसाठी प्रलंबित ठेवू नये, अशी सूचना करण्यात आली आहे.
कुटुंब न्यायालयात सकाळी ११ पासून काम
कुटुंब न्यायालयाच्या आस्थापनेतील आणि अधिपत्याखालील सर्व न्यायालयांमध्ये सकाळी ११ ते दुपारी २ या एकच सत्रात कामकाज केले जाईल. ३० जूनपर्यंत रोज एक न्यायपीठ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रकरणावर सुनावणी घेईल. दरम्यान, कोरोना नियंत्रणाकरिता नियमांचे पालन करणे अनिवार्य राहील, असे परिपत्रक प्रधान न्यायाधीश एम. एम. ठाकरे यांनी जारी केले आहे.