कार्यादेश झालेल्या फाईलही थांबल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:26 AM2020-12-11T04:26:06+5:302020-12-11T04:26:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मनपा सभागृहाच्या निर्देशानुसार कार्यादेश झालेली कामे सुरू होतील, अशी अपेक्षा होती. परंतु तत्कालीन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनपा सभागृहाच्या निर्देशानुसार कार्यादेश झालेली कामे सुरू होतील, अशी अपेक्षा होती. परंतु तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यानंतरही निधी उपलब्ध केला नाही. या कामासाठी २०२०-२१ या वर्षाच्या अर्थसंकल्पात ३५० कोटींची तरतूद केली. परंतु प्रशासनाने निधी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून कार्यादेश झालेल्या फाईल अजूनही थांबविल्या असल्याने नगरसेवक हतबल झाले आहेत.
पुढील वर्ष मनपा निवडणुकीचे आहे. गेल्या वर्षभरात प्रभागातील विकास कामे ठप्प आहेत. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी चार-पाच महिन्यांचाच कालावधी आहे. त्यात कार्यादेश झालेली कामे होत नसतील तर स्थायी समितीच्या अर्थसंकल्पाला महत्वच काय, असा प्रश्न नगरसेवकांना पडला आहे.
आधीच कोरोनामुळे महापालिकेचा अर्थसंकल्प उशिरा सादर झाला. त्यात लगेच विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघातील निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महिनाभर फाईल मंजुरीची प्रक्रिया ठप्प होती. आचारसंहिता संपताच कार्यादेश झालेली कामे सुरू होतील. अशी नगरसेवकांना अपेक्षा होती. मात्र अद्याप कामे सुरू झालेली नाही. दुसरीकडे बिल प्रलंबित असल्याने कंत्राटदार नवीन कामे घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने नगरसेवक स्वत: फाईल घेऊन मनपात चकरा मारत आहेत.
.......
३५० कोटींच्या कामांना ब्रेक
कोविडमुळे जवळपास आठ महिने कामे बंद होती. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ३५० कोटींच्या कामांना ब्रेक लावले होते. मुंढे गेले तरी अजूनही या कामांना मंजुरी मिळाली नाही. अर्थसंकल्प सादर करताना कार्यादेश झालेल्या कामासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली. आयुक्तांनी हिरवी झेंडी न दिल्याने अजूनही विकास कामांना ब्रेक लागले आहे.