आचारसंहितेत कार्यादेश झालेली कामे सुरू राहतील : मनपा आयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 11:30 PM2019-03-11T23:30:18+5:302019-03-11T23:31:12+5:30
लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली. आदर्श आचारसंहितेसंदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. या कालावधीत कुठल्याही नवीन निविदा काढल्या जाणार नाहीत. मात्र जुने कार्यादेश झालेली व सुरू असलेली कामे सुरू राहतील. तसेच देखभालीच्या कामावर परिणाम होणार नाही, अशी माहिती महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सोमवारी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली. आदर्श आचारसंहितेसंदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. या कालावधीत कुठल्याही नवीन निविदा काढल्या जाणार नाहीत. मात्र जुने कार्यादेश झालेली व सुरू असलेली कामे सुरू राहतील. तसेच देखभालीच्या कामावर परिणाम होणार नाही, अशी माहिती महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सोमवारी दिली.
निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील आयुक्त कक्षात सर्व विभागप्रमुखांची आयुक्तांनी बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अझीझ शेख, राम जोशी, उपायुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त राजेश मोहिते यांच्यासह सर्व अधिकारी, विभागप्रमुख व सहायक आयुक्त उपस्थित होते.
पाणीपुरवठा, आरोग्य सुविधांवर परिणाम नाही
आचारसंहितेसंदर्भात असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे. मात्र पाणीपुरवठा आणि आरोग्य या बाबी अत्यावश्यक सुविधेत मोडत असून त्यामध्ये कुठलाही खंड पडणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
मतदान केंद्रावरील सुविधांचा आढावा
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व मतदान केंद्रे ही सर्व सुविधांनी युक्त असायला हवीत. दिव्यांगांसाठी रॅम्प, पाणी आदी सुविधा तेथे असायला हव्यात. यासंदर्भात संबंधित झोनच्या सहायक आयुक्तांनी तातडीने केंद्रांची पाहणी करून अहवाल सोपविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.