काँग्रेस मागवणार ‘वर्क प्रोफाईल’
By Admin | Published: September 24, 2016 12:59 AM2016-09-24T00:59:19+5:302016-09-24T00:59:19+5:30
काँग्रेसच्या तिकिटावर महापालिकेची निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना आधी पक्षासाठी,
इच्छुक उमेदवारांकडून घेणार हिशेब : गांधी जयंतीपासून अर्ज वितरण
कमलेश वानखेडे नागपूर
काँग्रेसच्या तिकिटावर महापालिकेची निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना आधी पक्षासाठी, जनतेसाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा पक्षाकडे सादर करावा लागणार आहे. पक्षातर्फे इच्छुकांकडून ‘वर्क प्रोफाईल’ मागविले जाणार आहे. गांधी जयंतीला २ आॅक्टोबरपासून या संबंधीचे अर्ज देवडिया काँग्रेस भवनातून वितरित केले जाणार असून १५ आॅक्टोबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
यावेळी पहिल्यांदाच काँग्रेसतर्फे हा प्रयोग केला जाणार आहे. आजवर निवडणूक काळात पक्षातर्फे थेट उमेदवारी अर्ज वितरित केले जात होते. भरून आलेल्या अर्जांच्या आधारावर मुलाखती घेतल्या जात होत्या. आता त्यापूर्वी एक कवायत केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांकडून त्यांनी केलेल्या कामांची माहिती मागविली जाणार आहे. यासाठी पक्षातर्फे एक अर्ज छापण्यात आला आहे. संबंधित अर्ज इच्छुक उमेदवाराला नि:शुल्क दिला जाईल. या अर्जात उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे पुराव्यासह सादर करायची आहेत. इच्छुक उमेदवार कोणत्या प्रभागातून लढण्यास इच्छुक आहे, पक्षाने त्यालाच उमेदवारी का द्यावी, पक्षासाठी संबंधिताने आपल्या भागात कोणकोणते उपक्रम राबविले, त्या भागातील जनतेचे कोणते प्रश्न कोणत्या प्रकारे सोडविले.
प्रत्येक बूथवर हवी १५ मतदारांची शिफारस
काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराला उमेदवारीची दावेदारी पक्की करण्यासाठी प्रत्येक बूथवरील किमान १५ मतदारांची शिफारस मिळवावी लागणार आहे. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक होणार असल्यामुळे वाढीव बूथ रचनेनुसार एका प्रभागात साधारणत: ७० ते ८० बूथ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक बूथवर समर्थक मिळविताना इच्छुक उमेदवाराचा कस लागणार आहे. इच्छुक उमेदवाराला जनतेचे पाठबळ आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी हा प्रयोग केला जाणार आहे.
जनतेची उमेदवार निवडीसाठी मदत
वेळेवर उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या अधिक असते. बरेच कार्यकर्ते मोठमोठ्या शिफारशी घेऊन येतात. यावेळी मात्र शिफारशींपेक्षा प्रत्यक्षात प्रभागात केलेले काम विचारात घेऊन उमेदवारी दिली जाईल. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ‘वर्क प्रोफाईल’ मागविण्यात येणार आहे. पक्षाला लोकांमध्ये काम करणारा उमेदवार निवडण्यासाठी याची निश्चितच मदत होईल.
- विकास ठाकरे, शहर अध्यक्ष, काँग्रेस