तापत्या टीनाच्या शेड खाली ग्रामीण आरटीओचे कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 11:59 PM2019-05-31T23:59:26+5:302019-06-01T00:04:06+5:30
शहराचे तापमान ४६ अंशावर गेले असताना, अंगाची लाहीलाही होत असताना डोक्यापासून केवळ चार फुटावर असलेल्या टिनाच्या शेड खाली प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर ग्रामीणचा कार्यभार सुरू आहे. एका हाताने घाम पुसत दुसऱ्या हाताने कागदपत्राची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांपासून ते कर्मचारी त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, या कार्यालयाचा इमारतीचे बांधकाम सुरू होऊन चार वर्षे झालीत. १४ कोटी रुपयांवर निधी खर्चही झाला. परंतु अद्यापही बांधकाम अर्धवटच आहे. परिणामी, याचा फटका कार्यालयासोबत येथे येणाऱ्यां सामान्यांना बसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहराचे तापमान ४६ अंशावर गेले असताना, अंगाची लाहीलाही होत असताना डोक्यापासून केवळ चार फुटावर असलेल्या टिनाच्या शेड खाली प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर ग्रामीणचा कार्यभार सुरू आहे. एका हाताने घाम पुसत दुसऱ्या हाताने कागदपत्राची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांपासून ते कर्मचारी त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, या कार्यालयाचा इमारतीचे बांधकाम सुरू होऊन चार वर्षे झालीत. १४ कोटी रुपयांवर निधी खर्चही झाला. परंतु अद्यापही बांधकाम अर्धवटच आहे. परिणामी, याचा फटका कार्यालयासोबत येथे येणाऱ्या सामान्यांना बसत आहे.
कामठी रोडवरील अन्न पुरवठा विभागाच्या गोदामात २००८ पासून नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालय अडकून पडले आहे. केवळ आठ हजार चौरस फुटाच्या जागेवर जिल्हासह नागपूर विभागाचा डोलारा हे कार्यालय सांभाळत आहे. परंतु येथे सोयीच्या नावाने चार भिंती आणि डोक्यावर टिनाचे छप्पर एवढेच आहे. येथील कार्यालयीन कर्मचाऱ्यांसोबतच विविध कामानिमित्त येणाऱ्याना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. कार्यालयात पाण्याची विशेष सोय नाही. प्रसाधन गृहाचा अभाव आहे. येथील कर्मचारी परिसरातील ओळखीच्या घरातील प्रसाधन गृहाचा वापर करतात. महिला कर्मचाऱ्यांची तारांबळ उडते तर येथे येणारे वाहनधारक मैदानाचा आश्रय घेतात. कार्यालयात पार्किंगची सोय नाही. अवैध पार्किंगचा व्यवसाय जोरात सुरू आहे. स्वत:ची जागा नसल्याने कार्यालयाच्या चार भिंती सोडल्यास संपूर्ण परिसरात हातठेल्यांपासून ते ‘ऑनलाईन’ केंद्राचे अतिक्रमण आहे. अतिक्रमण एवढे की जिथे अर्जदारांची रांग लागते तिथेच दलालांचे टेबलही लागतात. कार्यालयाच्या आत तर भयाण चित्र आहे. कोंबड्याच्या खुराड्यासारख्या जागेत डोक्यापासून चार ते पाच फुटावर असलेल्या टिनाचा शेडखाली कार्यालयाचे कामकाज चालते.
डोक्याला रुमाल बांधून करावे लागते काम
कार्यालय प्रशासनाने पंखे व कुलरची सोय केली असलीतरी त्याचा फारसा फायदा होत नसल्याचे व ते कुचकामी ठरल्याचे येथील कर्मचारी सांगतात. डोक्याला रुमाल बांधूनच काम करावे लागत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. सततच्या घामामुळे व उष्ण हवेमुळे आरोग्य धोक्यात आल्याचेही काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.
चार वर्षे होऊनही बांधकाम अपूर्णच
आरटीओ कार्यालयाला ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या परिसरातील पाच एकरची जागा मिळाली. १४ कोटींचा निधीही मंजूर झाला. २०१४ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. दोन वर्षांच्या कालावधीत बांधकाम पूर्ण होणार होते. परंतु आता चार वर्षांचा कालावधी होऊनही बांधकाम पूर्ण झालेले नाही.
उन्हात लागते रांग
कार्यालयातील विविध खिडकींवर उभे राहण्यासाठी टिनाचे शेड टाकण्यात आले आहे. परंतु या शेडखाली दलालांचे टेबल लागत असल्याने कार्यालयात येणाऱ्यांना उन्हात उभे रहावे लागते तर, कर्मचाऱ्यांना तापत्या टिनाच्या शेडखाली घाम पुसत अर्जदारांचे काम करावे लागते.
आणखी एक महिन्याचा कालावधी
नागपूर ग्रामीण आरटीओचे बांधकाम पूर्ण झाले आहे. काही छोटेमोठे काम शिल्लक आहे. यामुळे नव्या इमारतीतून कार्यालयाचे कामकाज सुरू व्हायला आणखी एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
श्रीपाद वाडेकर
प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर ग्रामीण