कार्यालयात बसून नव्हे तर लोकांमध्ये जाऊन कामे होणार ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:07 AM2021-06-26T04:07:19+5:302021-06-26T04:07:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केवळ कार्यालयात बसून कागदोपत्री आकडेवारीवर भर न देता प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन, कामाच्या ठिकाणी भेट ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केवळ कार्यालयात बसून कागदोपत्री आकडेवारीवर भर न देता प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन, कामाच्या ठिकाणी
भेट देऊन काम करण्यावर आपला भर राहिला आहे. त्यामुळे नागपूर विभागातही याच पद्धतीने काम करणार असल्याचे नव्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी स्पष्ट केले. विभागीय आयुक्त पदाची नुकतीच सूत्रे होती घेतल्यानंतर शुक्रवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी मनमोकळी चर्चा केली. त्या म्हणाल्या, गत दोन दिवसांपूर्वी पदाची सूत्र हाती घेतली. त्यानंतर विविध विभागांचा आढावा घेतला. कोरोनामुळे ठप्प पडलेल्या उपक्रमांना गती देण्याच्या सूचना आपण संबंधिताना दिल्या आहेत. आता पावसाळ्याचे दिवस आहे तेव्हा
आपत्ती व्यवस्थपनासंदर्भात सर्व विभाागांमध्ये समन्वय कसा राहील, याचा प्रयत्न करू. विदर्भासाठी महत्वपूर्ण असलेले मिहान, गोसेखुर्द, झुडपी जंगल व सब कमिट्यांच्या अहवालाबाबत आढावा घेऊन कार्य केले जाईल. आपल्याला असलेला अनुभव यासाठी वापरू, असेही सांगितले. वृक्षारोपणाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, मोठमोठ्या टार्गेटची अनुभूती वेगळी असते. गावात जमिनीस्तरावरील स्थिती वेगळी व कागदोपत्री वेगळी असते. आता कागदोपत्रीला वाव नसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रविण टाके, अनिल गडेकर उपस्थित होते.
बॉक्स
लोकांचे जीव वाचविण्याला प्राधान्य
कोरोनाचे संकट आधीपेक्षा अधिक गडद होत आहे. आजारात दिवसागणिक बदल होत असल्याने हाताळणी करताना स्पष्ट दिशा नाही. विभागात काम करण्यास मोठा वाव असताना सध्याची स्थिती लक्षात घेता लोकांचे जीव वाचविण्याला आपले प्राधान्य राहिल., असेही विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले. कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहे. शिवाय टास्क फोर्सच्या निर्देशानुसार कार्य सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
-----------------