भूमिगत टँकची सफाई करताना मजुराचा गुदमरून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:47 AM2018-03-27T00:47:05+5:302018-03-27T00:47:17+5:30

एका केमिकल कंपनीतील भूमिगत आॅईल टँकची सफाई करताना विषारी वायूच्या संपर्कात आल्याने तीन मजूर गुदमरून बेशुद्ध झाले. उपचारादरम्यान त्यातील एकाचा करुण अंत झाला तर दोघांची प्रकृती अत्यवस्थ आहे. सोमवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान कामठी मार्गावरील भिलगावच्या गोवर्धन एनर्जी अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स प्रा. लि. या कंपनीत ही घटना घडली.

A worker died while cleaning an underground tank | भूमिगत टँकची सफाई करताना मजुराचा गुदमरून मृत्यू

भूमिगत टँकची सफाई करताना मजुराचा गुदमरून मृत्यू

Next
ठळक मुद्देविषारी वायूमुळे दोघे गंभीर : यशोधरानगरातील कंपनीत घडली घटना

लोकमत न्यूज नटवर्क
नागपूर : एका केमिकल कंपनीतील भूमिगत आॅईल टँकची सफाई करताना विषारी वायूच्या संपर्कात आल्याने तीन मजूर गुदमरून बेशुद्ध झाले. उपचारादरम्यान त्यातील एकाचा करुण अंत झाला तर दोघांची प्रकृती अत्यवस्थ आहे. सोमवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान कामठी मार्गावरील भिलगावच्या गोवर्धन एनर्जी अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स प्रा. लि. या कंपनीत ही घटना घडली.
चोरकू ऊर्फ छोटू (रा. गोपाल गंज, जि. सिवनी, मध्यप्रदेश) असे मृत मजुराचे नाव आहे. तर, हरिप्रसाद ऊर्फ राजू डेहरिया (३८) आणि कृष्णकुमार झारिया (३८) गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल असलेल्या मजुरांची नावे आहेत.
सूत्रानुसार ही कंपनी नीलेश महाजन, राहुल आगोजी आणि कपिल चांडक हे भागीदारीत चालवतात. कंपनी परिसरात जमिनीच्या आत आॅईलची १० हजार लिटरची टँक आहे. यात आॅईल टाकण्यासाठी एक गोलाकार झाकण आहे. ठेकेदार प्रकाश लिल्लारे यांना कंपनी आणि टँकच्या सफाईचे काम देण्यात आले होते. सोमवारी सफाई करण्यासाठी टँकला ९० टक्के खाली करण्यात आले होते. दुपारी १२ वाजता टँकचे झाकण उघडण्यात आले. सर्वप्रथम चोरकू ऊर्फ छोटू टँकमध्ये उतरला. बरेच वेळा आवाज देऊनही तो बाहेर आला नाही. त्यामुळे राजू टँकमध्ये उतरला. तो देखील बराच वेळ होऊन बाहेर आला नाही. वारंवार आवाज देऊन त्यांच्याकडूनही प्रतिसाद न मिळाल्याने कृष्णकुमार टँकमध्ये उतरला अन् तो देखील चोरकू तसेच राजूसारखा गुदमरून बेशुद्ध पडला. दरम्यान, टँकच्या सफाईसाठी गेलेले तीन मजूर बराच वेळ होऊनही टँकबाहेर न आल्याने आणि मोठमोठ्याने आवाज देऊनही त्यांच्याकडून कसलाच प्रतिसाद मिळत नसल्याने कंपनीच्या इतर कर्मचाऱ्यांना शंका आली. त्यांनी अग्निशमन दलाला सूचित केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन टँकमधून बेशुद्धावस्थेत असलेल्या तिघांनाही बाहेर काढले. राजू व कृष्णकुमारला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चोरकूला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी सायंकाळी ६.३० ते ७ च्या सुमारास चोरकूला मृत घोषित केले. या घटनेमुळे कंपनी परिसरात एकच खळबळ निर्माण झाली. सफाईचे काम हाती घेण्यात आलेली टँक अनेक दिवसांपासून बंद होती. त्यामुळे टँकमध्ये विषारी वायू तयार झाला असावा आणि मजूर गुदमरून बेशुद्ध झाले असावेत, असा प्राथमिक अंदाज संबंधितांनी बांधला आहे.
पायात दोरीचा फास अडकवून बाहेर काढले
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन अधिकारी एस. बी. रामगुनावार आपल्या सहकाºयांसोबत कंपनीत पोहोचले. टँकमध्ये तिघेही बेशुद्ध पडल्याचा अंदाज आल्यामुळे आतमध्ये विषारी वायू असावा, असा त्यांना संशय आला. त्यामुळे जवानांना टँकमध्ये उतरविणे जीवाशी खेळण्यासारखे आहे, हे लक्षात घेत त्यांनी मजुरांना बाहेर काढण्यासाठी युक्ती लढविली. त्यानंतर दोरीचा फास तयार करून तो मजुरांच्या पायात अडकवण्यात आला आणि त्यांना बाहेर काढण्यात आले.
व्यवस्थापक आणि ठेकेदार गजाआड
तिघेही मजूर अप्रशिक्षित होते. याची माहिती असूनही त्यांचे जीव धोक्यात टाकून त्यांना कुठलीही सुरक्षा उपलब्ध न करता कंपनी व्यवस्थापनाने त्यांना टँकमध्ये उतरवले. त्याचमुळे एका गरीब मजुराचा मृत्यू झाला आणि दोघे मृत्यूशी झुंज देत आहेत. या दुर्घटनेला कंपनीचा व्यवस्थापक अमित महाजन (४०, रा. कामठी) आणि सफाईचे कंत्राट घेणारा प्रकाश लिल्लारे (३८, रा. पार्वतीनगर, वांजरा) या दोघांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा अंदाज बांधून यशोधरानगर पोलिसांनी या दोघांविरुद्ध कलम ३०८, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. रात्री या दोघांनाही अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांनी लोकमतशी बोलताना दिली.

Web Title: A worker died while cleaning an underground tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.