नागपुरात वीज पडून कामगाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 09:11 PM2021-06-10T21:11:08+5:302021-06-10T21:11:40+5:30
झाडावर वीज पडल्याने झाडाखाली उभा असलेल्या एका कामगाराचा मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेले दोघे मात्र बचावले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - झाडावर वीज पडल्याने झाडाखाली उभा असलेल्या एका कामगाराचा मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेले दोघे मात्र बचावले. बुधवारी सायंकाळी ५.१५ च्या सुमारास बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
प्रभाकर प्रल्हाद बोदाडे (वय ४५) असे मृताचे नाव आहे. रुई पांजरी (हिंगणा) येथील रहिवासी असलेले बोदाडे ओरिएन्ट कंपनीत साफसफाईचे आणि परिसरात लावलेल्या विविध फुलझाडांच्या देखभालीचे काम करीत होते. काम आटोपल्यानंतर बोदाडे आणि त्यांच्यासोबत काम करणारे आणखी दोघे बुधवारी घराकडे जायला निघाले. मात्र, जोरदार पाऊस सुरु झाल्यामुळे ते रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाखाली उभे राहिले. तेवढ्यात जोरदार मेघगर्जनेसह विजेचा कडकडाट झाला आणि वीज अंगावर पडून डोक्याला जबर दुखापत झाल्याने बोदाडे यांचा मृत्यू झाला. सोबतच्या दोघांना मात्र किरकोळ दुखापत झाल्याने ते बचावले. बेलतरोडीचे ठाणेदार विजय आकोत यांनी घटनेची माहिती मिळताच तिकडे धाव घेतली. बोदाडे यांचा मृतदेह मेडिकलमध्ये रवाना करण्यात आला. या घटनेचे वृत्त कळताच रुई पांजरी गावात शोककळा पसरली.