बूथ मॅनेजमेंटमध्ये कार्यकर्ते होते व्यस्त :मतदारांना केली मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:00 AM2019-04-12T00:00:21+5:302019-04-12T00:16:55+5:30
राजकीय पक्षासाठी बूथप्रमुख हा खऱ्या अर्थाने निवडणुकीचा कणा असतो. तो उमेदवाराच्या प्रचार खऱ्या अर्थाने प्रत्येक मतदारापर्यंत करतोच, पण मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राबाहेर बसून मतदारांना मार्गदर्शन आणि त्यांच्या अडचणी सोडविण्याचे काम करतो. यंदा मतदार यादीत झालेला घोळ, अनेक मतदारांना व्होटर लिस्ट न मिळाल्यामुळे आलेल्या अडचणी त्यामुळे मतदार त्रस्त होते. पण बूथप्रमुखांनी आपल्या सहकाऱ्यांना मतदान केंद्राच्या २०० फूट अंतरावर बसवून लॅपटॉप, अॅण्ड्रॉईड मोबाईल, व्होटर लिस्टद्वारे मतदारांना त्यांचे मतदान केंद्र शोधण्यास मदत केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राजकीय पक्षासाठी बूथप्रमुख हा खऱ्या अर्थाने निवडणुकीचा कणा असतो. तो उमेदवाराच्या प्रचार खऱ्या अर्थाने प्रत्येक मतदारापर्यंत करतोच, पण मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राबाहेर बसून मतदारांना मार्गदर्शन आणि त्यांच्या अडचणी सोडविण्याचे काम करतो. यंदा मतदार यादीत झालेला घोळ, अनेक मतदारांना व्होटर लिस्ट न मिळाल्यामुळे आलेल्या अडचणी त्यामुळे मतदार त्रस्त होते. पण बूथप्रमुखांनी आपल्या सहकाऱ्यांना मतदान केंद्राच्या २०० फूट अंतरावर बसवून लॅपटॉप, अॅण्ड्रॉईड मोबाईल, व्होटर लिस्टद्वारे मतदारांना त्यांचे मतदान केंद्र शोधण्यास मदत केली.
संतापाचा सामनाही करावा लागला
दक्षिण-पश्चिम नागपुरातील जवळपास सर्वच मतदान केंद्रांजवळ विविध पक्षांतील कार्यकर्त्यांकडून मतदारांना त्यांच्या ‘बूथ’च माहिती देण्यात येत होती. उमेदवारांच्या ‘बूथ’वर मतदार यादीसोबतच ‘लॅपटॉप’,मोबाईलची मदतदेखील घेण्यात येत होती. प्रतापनगर, खामला, त्रिमूर्तीनगर या भागात ‘पेन्डॉल’मध्ये हे ‘बूथ’ होते. मात्र अनेक ठिकाणी झाडाखाली ‘बूथ’ लावण्यात आले होते. उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे शिवणगाव, जयताळा, त्रिमूर्तीनगर, अजनी या भागात काही जणांना दुपारनंतर उन्हातच बसावे लागले. एकीकडे मतदारांची नावे यादीत सापडत नसल्यामुळे संतापाचा सामनादेखील त्यांनाच करावा लागत होता. दुसरीकडे कामात व्यस्त असतानादेखील उमेदवारांना सातत्याने ‘अपडेट’ द्यावे लागत होते.
गैरसोय टळली
बूथवर मतदार यादी, सोबतच लॅपटॉप, अॅण्ड्रॉईड मोबाईल आदी सह कार्यकर्ते सज्ज होते. या निवडणुकीत या बूथचा खऱ्या अर्थाने मतदारांना फायदा झाला. निवडणुक विभाग मतदारांना स्लीप पोहचविण्यात अयशस्वी ठरले. शिवाय अनेकांचे यादीमध्ये नाव सुद्धा दिसत नव्हते. अशावेळी मतदारांनी बूथवर संपर्क साधला. काही कार्यकर्ते यादीमध्ये नाव शोधायचे. तर काहीजवळ मतदार अॅप होते. त्यावर नाव टाकले की, मतदान केंद्र क्रमांक आणि अनुसूची क्रमांक येत होता. त्यामुळे बऱ्याच मतदारांना त्यांचे मतदान केंद्र शोधणे शक्य झाले.
नाश्ता आणि पाण्याची सोय
शिवाय बूथवर मतदारांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. उन्हाचा तडाखा जास्तच जाणवत असल्याने मतदारांना थंड पाणी सुद्धा उपलब्ध होत होते. एका पक्षाने तर बूथवर नाश्त्याची सुद्धा सोय केली होती. बूथवर नाव शोधण्यासाठी आलेल्या प्रत्येकाला पक्षाचे कार्यकर्ते नाश्ता करूनच जाण्याचा आग्रह करीत होते.
बीएलओची ही झाली मदत
शिवाय निवडणुक आयोगाने मतदान केंद्राजवळ बीएलओची सोय केली होती. बीएलओ म्हणून शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. पण बीएलओ कडे केवळ मतदारांची यादी होती. त्यांचा सुद्धा बऱ्याच मतदारांना फायदा झाला.