नागपूर जिल्ह्यातील मौदा येथील ‘एनटीपीसी’त कामगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 09:32 PM2019-07-26T21:32:33+5:302019-07-26T21:37:01+5:30

कोळशाच्या ‘वॅगन’ची ‘हूक’ सरळ करीत असतानाच ‘ऑपरेटर’ने ‘सायडम चार्जर’ मागे घेतला. त्यात मध्यभागी दबल्या गेल्याने कंत्राटी कामगाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्याचवेळी ‘एनटीपीसी’च्या मुख्य महाप्रबंधकांनी घटनास्थळी येऊन नुकसान भरपाईबाबत बोलणी करण्याची मागणी कामगारांनी रेटून धरली. ते न आल्याने कामगारांनी त्यांच्या बंगल्याकडे मोर्चा वळवित बंगल्याच्या काचा व परिसरातील कुंड्यांची तोडफोड केली. कामगार ऐकायला तयार नसल्याने दंगा नियंत्रण पथकाच्या जवानांनी सौम्य लाठीमार करीत कामगारांना पांगविण्याचा प्रयत्न केला. त्यात दोघांना दुखापत झाली. हा प्रकार शुक्रवारी सकाळी मौदा येथे घडला.

Worker's death in 'NTPC' in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील मौदा येथील ‘एनटीपीसी’त कामगाराचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील मौदा येथील ‘एनटीपीसी’त कामगाराचा मृत्यू

Next
ठळक मुद्दे‘सायडम चार्जर’ व कोळशाच्या ‘वॅगन’मध्ये दबला कामगारसंतप्त कामगारांवर पोलिसांचा सौम्य लाठीमार : दोघे जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (तारसा/मौदा) : कोळशाच्या ‘वॅगन’ची ‘हूक’ सरळ करीत असतानाच ‘ऑपरेटर’ने ‘सायडम चार्जर’ मागे घेतला. त्यात मध्यभागी दबल्या गेल्याने कंत्राटी कामगाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्याचवेळी ‘एनटीपीसी’च्या मुख्य महाप्रबंधकांनी घटनास्थळी येऊन नुकसान भरपाईबाबत बोलणी करण्याची मागणी कामगारांनी रेटून धरली. ते न आल्याने कामगारांनी त्यांच्या बंगल्याकडे मोर्चा वळवित बंगल्याच्या काचा व परिसरातील कुंड्यांची तोडफोड केली. कामगार ऐकायला तयार नसल्याने दंगा नियंत्रण पथकाच्या जवानांनी सौम्य लाठीमार करीत कामगारांना पांगविण्याचा प्रयत्न केला. त्यात दोघांना दुखापत झाली. हा प्रकार शुक्रवारी सकाळी मौदा येथे घडला.
अजय केशवराव मोटघरे (२१, रा. आजनगाव, ता. मौदा) असे मृत कंत्राटी कामगाराचे नाव असून, मयूर ठाकरे (२३, रा. धामणगाव, ता. मौदा) व शुभम श्रीरामे (३०, रा. खंडाळा, ता. मौदा) अशी लाठीमारात जखमी झालेल्यांची नावे आहेत. अजय ‘एनटीपीसी’ प्रकल्पग्रस्त असल्याने तो या प्रकल्पातील ‘एमजीआर’ विभागात कंत्राटी कामगार म्हणून काम करायचा. रात्रपाळी असल्याने तो गुरुवारी रात्री १० वाजता कामावर रुजू झाला होता. शुक्रवारी सकाळी ५ वाजताच्या सुमारास रेल्वे कोळसा घेऊन ‘वॅगन टिपलर’मध्ये आली.
‘हूक’ वाकल्याने ‘वॅगन’ ‘सायडम चार्जर’ जोडली जात नव्हती. त्यामुळे अजय ती ‘हूक’ सरळ करीत होता. ‘सायडम चार्जर’ ‘वॅगन’पासून दोन फुटावर होती. वर केबिनमध्ये बसलेल्या ‘ऑपरेटर’ला मात्र हा प्रकार लक्षात आला नाही. त्याने ‘सायडम चार्जर’ पुढे करताच अजय ‘सायडम चार्जर’ व ‘वॅगन’च्या मध्यभागी दबल्या गेला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कामगारांसह ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. त्यातच कामगारांनी प्रकल्पाचे मुख्य महाप्रबंधक आलोक गुप्ता यांनी घटनास्थळी येऊन अजयच्या कुटुंबीयांचे सांत्वन करावे तसेच नुकसानभरपाईबाबत बोलणी करावी, अशी मागणी रेटून धरली.
मुख्य महाप्रबंधक घटनास्थळी न आल्याने कामगार व ग्रामस्थांनी त्यांचा मोर्चा आलोक गुप्ता यांच्या बंगल्याकडे वळविला. त्यातच मौदा पोलिसांनी अतिरिक्त कुमक व दंगा नियंत्रण पथकाला पाचारण केले. संतप्त कामगारांनी बंगल्याच्या काचा व परिसरातील कुंड्यांची तोडफोड करायला सुरुवात करताच पोलिसांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यात दोघांना दुखापत झाली. पोलीस अधीक्षक राकेश ओला बंगल्याच्या आवारात दाखल होताच कामगार शांत झाले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, ठाणेदार मधुकर गीते हजर होते.
दुसरीकडे, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते व देवेंद्र गोडबोले यांनी यशस्वी मध्यस्थी केल्यानंतर दुपारी १२ च्या सुमारास अजयचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील मेयो रुग्णालयात पाठविण्यात आला. सायंकाळी त्याच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. जखमी मयूर व शुभम यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले. दुसरीकडे, या घटनेला दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देवेंद्र गोडबोले यांच्यासह नागरिकांनी केली.
प्रकल्प व मृताच्या कुटुंबीयांमध्ये समझोता
अजयच्या वडिलांची शेती ‘एनटीपीसी’ प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आल्याने त्याला या प्रकल्पामध्ये कंत्राटी कामगार म्हणून नोकरी मिळाली होती. हा तिढा सोडविण्यासाठी उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, देवेंद्र गोडबोले, तहसीलदार प्रशांत सांगडे व अजयच्या कुटुंबीयांनी प्रकल्पाचे मुख्य महाप्रबंधक आलोक गुप्ता यांच्याशी चर्चा केली. गुप्ता यांनी अजयच्या कुटुंबीयांना ३५ लाख रुपये नुकसान भरपाई आणि त्या कुटुंबातील एकाला प्रकल्पात नोकरी देण्याचे मान्य केले. असा त्यांच्यात लेखी समझोता झाला.
तांत्रिक बिघाडाकडे दुर्लक्ष
या ‘वॅगन टिपलर’मधील ‘सायडम चार्जर’च्या हालचालींची सूचना देण्यासाठी ‘अलार्म’ लावला आहे. तो ‘अलार्म’ काही दिवसांपासून बंद आहे. त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले. घटनेच्यावेळी तिथे सुपरवायझर देवानंद कार्यरत होते. ‘सायडम चार्जर’ ‘ऑपरेट’ करण्यासाठी येथे वर काचेची ‘केबिन’ असून, त्याच्या काचांवर कोळशाची धूळ मोठ्या प्रमाणात जमा झाल्याने ‘केबिन’मधील ‘ऑपरेटर’ला खालचे काहीही दिसत नाही. येथील ‘अलार्म’ सुरू असता किंवा काचांवर धूळ नसती तर कदाचित हा अपघात झाला नसता.

Web Title: Worker's death in 'NTPC' in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.