रेल्वे वर्कशॉपमध्ये कामगाराचा मृत्यू

By admin | Published: September 11, 2016 02:12 AM2016-09-11T02:12:22+5:302016-09-11T02:12:22+5:30

जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कामठी मार्गावर असलेल्या दपूम रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये शनिवारी

Worker's death in railway workshop | रेल्वे वर्कशॉपमध्ये कामगाराचा मृत्यू

रेल्वे वर्कशॉपमध्ये कामगाराचा मृत्यू

Next

क्रेनचालकाचा बेजबाबदारपणा : कुटुंबास आर्थिक मदत देण्याची मागणी
नागपूर : जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कामठी मार्गावर असलेल्या दपूम रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये शनिवारी सकाळी क्रेनच्या खाली आल्यामुळे एका २२ वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. अक्षय बमनोटे रा. बेलीशॉप रेल्वे कॉलनी असे मृत कामगाराचे नाव आहे. दरम्यान मृत कामगाराच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी रेल्वे वर्तुळातून होत आहे.
मृत अक्षयचे वडील राजन बमनोटे रेल्वेचे कर्मचारी आहेत. वर्कशॉपमध्ये कंत्राटदार गोपाल राव यांना कोचच्या चेचिसच्या सफाईचे काम देण्यात आलेले आहे. या कंत्राटदाराकडे अक्षय काम करीत होता. नेहमीच्या पद्धतीने कोचच्या चेचिसला रेती प्रक्रियेद्वारे साफ केल्यानंतर जेसीबीच्या मदतीने चेचिस रेल्वे रुळावर ठेवण्याचे काम सुरू होते. संतुलन राखण्यासाठी जेसीबीने चेचिस उचलल्यानंतर चेसीसला हा युवक पकडून ठेवत होता. सकाळी ११.१५ वाजता जेसीबी चालक चेसिस उचलत असताना अचानक जेसीबी त्याच्या नियंत्रणाबाहेर जाऊन अक्षय गंभीर जखमी झाला. त्यानंतर जेसीबीचा चालक फरार झाला. मृत अक्षय रेल्वेचा कर्मचारी नसल्यामुळे रेल्वे प्रशासनाने त्याच्या उपचारासाठी कोणतेही वाहन उपलब्ध करून दिले नाही. जवळपास दोन तास तो घटनास्थळीच पडून होता. या घटनेमुळे रेल्वे वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. घटनेची माहिती मिळताच जरीपटक्याचे पोलीस निरीक्षक चक्षुपाल बहादुरे आणि पोलीस घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी आरोपी क्रेन चालकाच्या विरुद्ध बेजबाबदारपणे जेसीबी चालविण्याचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान अक्षयच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना संबंधित कंत्राटदार आणि रेल्वे प्रशासनाने आर्थिक मदत करण्याची मागणी होत आहे.(प्रतिनिधी)

अतिशय दुर्दैवी घटना
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल यांनी घडलेली घटना अतिशय वाईट असल्याचे सांगितले. मोतीबाग वर्कशॉपचे नियंत्रण बिलासपूर मुख्यालयातून करण्यात येते. त्यामुळे या घटनेच्या तपासासाठी कमिटीचे गठन झोन कार्यालयातून होणार असल्याचे ते म्हणाले.
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
दपूम रेल्वे मजदूर कॉंग्रेसचे विभागीय संयोजक एल. पीतांबर आणि रेल्वे कामगार सेनेचे कार्याध्यक्ष मनोज समर्थ यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगितले. या घटनेमुळे या वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी रेल्वे प्रशासनाने वेळीच खबरदारी न घेतल्यास संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

Web Title: Worker's death in railway workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.