कामगारांची चार महिन्यांची मजुरी रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:07 AM2021-06-11T04:07:00+5:302021-06-11T04:07:00+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापा : कन्हान नदीवरील काेच्छी बॅरेजमधील पाणी नागपूर शहराला पिण्यासाठी भूमिगत पाईप लाईन टाकण्याचे काम युद्धपातळीवर ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापा : कन्हान नदीवरील काेच्छी बॅरेजमधील पाणी नागपूर शहराला पिण्यासाठी भूमिगत पाईप लाईन टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कंत्राटदाराने या कामासाठी उत्तर प्रदेशातून कामगार आणले आहे. काम करवून घेतल्यानंतरही त्यांना कंत्राटदाराने चार महिन्यांची मजुरी दिली नाही. त्यातच कंत्राटदार दीड महिन्यापासून बेपत्ता असून, मजुरीअभावी उपासमारीची वेळ ओढवली असल्याचे कामगारांनी सांगितले.
सात किमी पाईप लाईनच्या कामाचे कंत्राट हैदराबाद (तेलंगणा) येथील ‘आयएचपीएमएल’ कंपनीला दिले आहे. या कंपनीने एस. के. रहमान यांना सब काॅन्ट्रॅक्ट दिला आहे. या कामाला चार महिन्यापूर्वी सुरुवात करण्यात आली असून, त्यासाठी लागणारे २५ कामगार गाेरखपूर (उत्तर प्रदेश) जिल्ह्यातून आणले आहेत. त्यांनी काेच्छी-नंदापूर (ता. सावनेर) गावापासून या कामाला सुरुवात केली. रहमान यांनी कामगारांना पूर्ण मजुरी देण्याऐवजी दर आठवड्याला थाेडीफार रक्कम देत काळ काढला. या रकमेतून त्यांनी दैनंदिन गरजा भागवल्या.
त्यातच दीड महिन्यापासून कंत्राटदार कामावर अथवा कामगारांना भेटायला आले नाही. त्यामुळे मजुरीची पूर्ण अथवा थाेडीफार रक्कमही मिळाली नाही. पूर्वी दिलेली रक्कम खर्च झाल्याने जीवनावश्यक साहित्य खरेदी करायला पैसे नाही तसेच या परिसरात कुणीही ओळखत नसल्याने उधारीवर साहित्य द्यायला कुणी तयार नाही, असेही कामगारांनी सांगितले. परिणामी, कंत्राटदाराने मजुरीची पूर्ण रक्कम तातडीने द्यावी तसेच प्रशासनाने कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी अखिलेश कुमार, कमलेश कुमार, टुनटून गौर, मिथुन गौर, अनुप गौर, धरमू यादव, बिरजू प्रसाद यासह अन्य कामगारांनी केली आहे.
....
उपासमारीची वेळ
पैसे संपल्याने तसेच कुणीही उधारीत साहित्य देत नसल्याने कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे, असेही कामगारांनी सांगितले. मजुरी मिळावी म्हणून कंत्राटदाराशी वेळावेळी फाेनवर संपर्क साधला. प्रत्येक वेळी कंत्राटदार धमकी देत असल्याचा आराेप कामगारांनी केला. कंत्राटदाराच्या गैरहजेरीत सुपरवायझर काम बघत असून, दीड महिन्यापासून कंत्राटदार कामावर आले नाही. त्यामुळे मजुरी मागायची कुणाला, असा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
===Photopath===
090621\1625img_20210609_120104.jpg
===Caption===
कामाची मजुरी रगडली.