नागपुरातील शासकीय कार्यालयातअंतर राखून कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 11:56 PM2020-06-08T23:56:58+5:302020-06-08T23:58:22+5:30
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून आता हळूहळू सूट देण्यास प्रारंभ होत आहे. शहरातील विविध कार्यालयांमध्ये कामकाजाला सोमवारी सुरुवात झाली. यादरम्यान सुरक्षितता आणि अंतराला महत्त्व दिले जात आहे. काही कार्यालयांमध्ये पहिल्याच दिवशी गर्दी उसळलेली पाहण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून आता हळूहळू सूट देण्यास प्रारंभ होत आहे. शहरातील विविध कार्यालयांमध्ये कामकाजाला सोमवारी सुरुवात झाली. यादरम्यान सुरक्षितता आणि अंतराला महत्त्व दिले जात आहे. काही कार्यालयांमध्ये पहिल्याच दिवशी गर्दी उसळलेली पाहण्यात आली.
भूमीअभिलेख कार्यालयात जमिनीशी संबंधित कामकाजाला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी नागरिकांची चांगलीच गर्दी दिसत होती. भूमिअभिलेख विभागाचे नगर भूमापन अधिकारी भूषण मोहिते म्हणाले, गर्दी लक्षात घेता, सुरक्षित अंतराची काळजी घेतली जात आहे. यादृष्टीने प्रभागवार दिवस ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण राखता येईल.
नागरिकांसाठी सुरक्षित अंतर राखणे अनिवार्य केले आहे. अर्जदारांसाठी टोकन पद्धत सुरू केली आहे. थर्मल स्क्रीनिंगनंतरच नागरिकांना कार्यालयामध्ये प्रवेश दिला जाईल. कार्यालयात रजिस्टर ठेवण्यात आले असून त्यात नाव, पत्ता याची नोंद घेतली जात आहे. नोंद केल्यावर सॅनिटायझरचा वापर आवश्यक केला आहे.
प्रभागवार असे होईल कामकाज
नगर भूमापन अधिकारी भूषण मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या व्यवस्थेनुसार यापुढे प्रभागवार कामे होतील. सोमवार, बुधवार व शुक्रवारी मौजा लेंड्रा, पांढराबोडी, अजनी, धंतोली, अंबाझरी, खामला, भामटी, जरीपटका, मानकापूर, दाभा, पोलीस लाईन टाकळी, झिंगाबाई टाकळी तसेच सोमलवाड्याशी संबंधित कामकाज होईल. सोमवार व बुधवारी चिंचभुवन, सोनेगाव, धरमपेठ, फुटाळा व तेलंखेडी, मंगळवार व गुरुवारी जयताळा, परसोडी, सीताबर्डी, हजारीपहाड, गोरेवाडा, काचीमेट, जाटतरोडी, बोरगाव येथील कामे होतील. संबंधित विभागाचे कर्मचारी ठरविलेल्या दिवशी हजर राहतील.