डॉक्टरांचे आजपासून कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 01:54 AM2017-10-07T01:54:39+5:302017-10-07T01:54:50+5:30
नागपूर : महाराष्टÑ सुरक्षा दलाचे सुरक्षारक्षक गेल्या २० दिवसांपासून संपावर गेल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील (मेडिकल) निवासी डॉक्टरांचा जीव टांगणीला लागला आहे. एखादी अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित करीत शनिवारपासून बाह्यरुग्ण विभागाच्या (ओपीडी) वेळात कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने घेतला.आहे.
मेडिकलमधील कुचकामी सुरक्षा व्यवस्था व डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांना घेऊन मागील वर्षी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ संपावर गेली होती. अखेर सरकारने राज्यभरातील सर्व मेडिकलच्या सुरक्षेची जबाबदारी महाराष्टÑ सुरक्षा दलाकडे सोपविली. परंतु या दलातील सुरक्षा रक्षकांनी पगारवाढ व नोकरीवर कायम करण्याच्या मागणीला घेऊन १९ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून संप पुकारला. विशेष म्हणजे, २१ दिवस होऊनही या संपावर तोडगा निघाला नाही. यामुळे रुग्णालयच्या वॉर्डा-वॉर्डात रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी वाढली असून डॉक्टरांचा सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. सुरक्षेला घेऊन ‘मार्ड’ संघटनेने वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत पत्रव्यवहार केला. अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनाही निवेदन दिले. परंतु अद्यपाही उपाययोजना नाही. अखेर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी सर्व निवासी डॉक्टरांनी दंडाला काळ्या फिती बांधून आंदोलन केले तर सायंकाळी अधिष्ठाता कार्यालयासमोर नारे-निर्दशने केली.
अधिष्ठात्यांनी मागितला दोन दिवसांचा वेळ
अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी दोन दिवसांचा वेळ मागितला आहे. तोपर्यंत सुरक्षा रक्षकावर तोडगा निघेल, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. याला घेऊन रात्री मार्डची बैठक झाली. या बैठकीत शनिवारपासून ओपीडीच्या वेळेत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
-डॉ. प्रदीप कासवान
अध्यक्ष, मार्ड मेडिकल
सुरक्षेला घेऊन संचालकांना दिले पत्र
मार्डच्या मागणीला घेऊन वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव व संचालकांना पत्र पाठविले आहे. यात सुरक्षा रक्षक पुरविण्याबाबत निर्णय घेण्याचे म्हटले आहे. येत्या दोन दिवसांत यावर निर्णय होईल, अशी शक्यता आहे.
-डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल