‘पाणी गुणवत्ता व स्वच्छता’ यावर कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:09 AM2021-03-10T04:09:18+5:302021-03-10T04:09:18+5:30
हिंगणा : स्थानिक पंचायत समितीच्या बचत भवनात पाणी गुणवत्ता व स्वच्छता या विषयावर चार दिवसीय कार्यशाळेचे नुकतेच आयाेजन करण्यात ...
हिंगणा : स्थानिक पंचायत समितीच्या बचत भवनात पाणी गुणवत्ता व स्वच्छता या विषयावर चार दिवसीय कार्यशाळेचे नुकतेच आयाेजन करण्यात आले. यात तज्ज्ञ व अतिथींनी उपस्थितांना पाणी व स्वच्छतेचे महत्त्व व गुणवत्ता यावर विस्तृत मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग यांच्या हस्ते करण्यात आले. प्रत्येकाला पिण्यासाठी स्वच्छ व गुणवत्तापूर्ण पाणी मिळावे, हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. साेबतच प्रत्येकाने त्यांचे घर व घराचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे. सुरुवात स्वत:पासून केल्यास आपण पुढील पिढीला काही तरी आदर्श देऊ शकू, असे प्रतिपादन दिनेश बंग यांनी केले. अशा प्रकारच्या कार्यशाळेचे आयाेजन तालुक्यापुरत्याच मर्यादित न राहता त्या प्रत्येक गावात पाेहाेचायला पाहिजे. गावातील प्रत्येक नागरिकाला याचे महत्त्व पटवून देत त्यांनी यात सक्रिय सहभागी व्हावे, यासाठी विशेष प्रयत्न करायला हवे. या उपक्रमात नागरिक व महिला माेठ्या संख्येने सहभागी झाल्या तर खऱ्या अर्थाने या उपक्रमाचा प्रत्येकाला फायदा हाेईल, असेही जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग यांनी सांगितले. या कार्यशाळेला पंचायत समितीच्या उपसभापती सुषमा कावळे, जिल्हा परिषद सदस्य नीता वलके, खंडविकास अधिकारी महेंद्र जुवारे, पंचायत समिती सदस्य सुनील बोंदाडे, अनसूया सोनवाणे, पौर्णिमा दीक्षित यांच्यासह हिंगणा तालुक्यातील सरपंच, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.