जागतिक एडस दिन; होमो सेक्समुळे वाढतोय एचआयव्ही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 10:41 AM2018-12-01T10:41:30+5:302018-12-01T10:44:01+5:30
‘होमो सेक्स’मुळे ‘एचआयव्ही’ होण्याचा धोका वाढला जात आहे. तज्ज्ञाच्या मते ‘गे सेक्स’ संबंध ठेवणाऱ्यांमध्ये ‘एचआयव्ही पॉझिटीव्ही’चे प्रमाण २८ टक्क्यांनी वाढते आहे.
सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : असुरक्षित शारीरिक संबंध, एचआयव्हीबाधित रक्त, इंजेक्शनच्या दूषित सुया आणि गर्भावस्थेत एड्सग्रस्त मातेकडून गर्भाला होणारे संक्रमण या बाबत एड्स नियंत्रण विभागाकडून होत असलेली जनजागृती व समाजाचा काही प्रमाणात बदलेला दृष्टिकोनामुळे नागपूर जिल्ह्यात एचआयव्हीबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. २०१२-१३ मध्ये नवे १९०० रुग्ण आढळून आले होते ते २०१७-१८ मध्ये ११६४ रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, दूषित इंजेक्शन आणि गर्भावस्थेत गर्भाला होणारे संक्रमणात घट आली आहे. मात्र, ‘होमो सेक्स’मुळे ‘एचआयव्ही’ होण्याचा धोका वाढला जात आहे. तज्ज्ञाच्या मते ‘गे सेक्स’ संबंध ठेवणाऱ्यांमध्ये ‘एचआयव्ही पॉझिटीव्ही’चे प्रमाण २८ टक्क्यांनी वाढते आहे.
एचआयव्ही पूर्ण बरे करता येत नाहीत म्हणून प्रतिबंध अत्यंत महत्त्वाचा आहे. वेळेवर घेतलेले एआरटी (अँटी रिट्रोव्हायरल थेरपी) उपचार व सकारात्मक जीवनशैली हे एचआयव्ही व एड्स असलेल्या लोकांना अनेक वर्षे सामान्य जीवन जगण्यास मदत करतात. त्याचा प्रभाव आता दिसून येत आहे. ‘डिस्ट्रिक्ट एड्स प्रिव्हेंशन अॅण्ड कंट्रोल युनिट्स’ (डीएपीसीयू) नागपूरने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार २०१२-१३ मध्ये एचआयव्ही पॉझिटिव्ह बाधितांची संख्या १९०० होती, २०१३-१४ मध्ये ही संख्या कमी होऊन १६६६ वर आली. २०१४-१५ मध्ये १५४८ रुग्ण होते, २०१५-१६ मध्ये १३१९, २०१६-१७ मध्ये १२४५, २०१७-१८ मध्ये ११६४ रुग्णांची नोंद झाली आहे. एकीकडे बाधितांची संख्या निश्चित कमी झाली असली तरी युवकांमध्ये ‘होमो सेक्स’चे प्रमाण वाढत असल्याने ‘एचआयव्ही’चा धोका वाढला आहे. याची निश्चित आकडेवारी नाही.
परंतु रुग्ण दिसून येऊ लागले आहेत. ‘सेक्स वर्कर’ व इंजेक्शनमधून ‘ड्रग्स’ घेणाऱ्यानंतर जगभरात ‘गे सेक्स’ला एड्स पसरवण्याचे सर्वात मोठे तिसरे कारण मानले गेले आहे, असे या क्षेत्रातील वैद्यकीय तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
एआरटी केंद्रांवर रुग्ण झाले कमी
मेडिकलमधील अँटी रिट्रोव्हायरल थेरपी केंद्रांवर (एआरटी) उपचार घेणाऱ्या एचआयव्हीबाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. २०१६ मध्ये ४४९ पुरुष व ३२९ महिला व ३५ लहान मुले असे एकूण ८१३ नवे रुग्णांची नोंद झाली. २०१७ मध्ये ४१४ पुरुष, ३०९ महिला तर ३१ मुले असे एकूण ७५४ तर २०१८ नोव्हेंबरपर्यंत ३३२ पुरुष, २२२ महिला तर ११ मुले असे एकूण ५६८ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
एचआयव्ही संसर्ग कमी करण्यासाठी लोककलेद्वारे एचआयव्ही जनजागृतीचे कार्यक्रम, आशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस, परिचारिका, आयटीआय विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे एचआयव्ही तपासणी सुविधा आणि समुपदेशनामुळे नव्या एचआयव्हीबाधितांच्या संख्येत घट आली आहे. आता थांबायचे नाही, ही संख्या शून्यावर आणण्याचे लक्ष्य आहे.
-डॉ. संजय जयस्वाल, उपसंचालक, आरोग्य सेवा नागपूर मंडळ