जागतिक एड्स दिन; नागपूर जिल्ह्यात एचआयव्ही बाधितांमधील निम्मे रुग्ण तरुणमध्यम वयोगटातले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 07:30 AM2021-12-01T07:30:00+5:302021-12-01T07:30:02+5:30
Nagpur News नागपूर जिल्ह्यात मागील ५ वर्षांत आढळून आलेल्या एचआयव्हीबाधितांमध्ये अर्धे रुग्ण हे ३५ ते ४९ वयोगटातील आहेत. यांची टक्केवारी तब्बल ४७.२३ टक्के आहे.
सुमेध वाघमारे
नागपूर : असुरक्षित लैंगिक संबंध किंवा दूषित रक्त संक्रमण किंवा मातेकडून गर्भाला किंवा स्तनपान करणाऱ्या बाळाला संक्रमण शिरेतून किंवा नशा आणणाऱ्या औषधांच्या वापरातून ‘एचआयव्ही’ पसरतो. यामुळे या रोगाला वयोगटाची मर्यादा नाही. मात्र, नागपूर जिल्ह्यात मागील ५ वर्षांत आढळून आलेल्या एचआयव्हीबाधितांमध्ये अर्धे रुग्ण हे ३५ ते ४९ वयोगटातील आहेत. यांची टक्केवारी तब्बल ४७.२३ टक्के आहे.
एचआयव्ही एड्सविषयी अव्याहतपणे चाललेल्या जनजागृतीचा सकारात्मक परिणाम दिसून येऊ लागला आहे. बाधितांच्या संख्येत घट झाली असून, औषधोपचारामुळे आयुर्मानही वाढले आहे. नागपूर जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथकाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, मागील ५ वर्षांत ४ लाख २४ हजार १३१ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. यात १४ वर्षांखालील ३.२८ टक्के, १५ ते २४ वयोगटात ६.९३ टक्के, २५ ते ३४ वयोगटात २१.९६ टक्के, ३५ ते ४९ वयोगटात ४७.२३ टक्के, तर ५० च्या वरील वयोगटात २०.५७ टक्के बाधित आढळून आले आहेत. तज्ज्ञांच्या मते, २५ वरील वयोगटात या आजाराची व्यापक जनजागृती केल्यास एचआयव्हीबाधितांच्या संख्येत आणखी घट आणली जाऊ शकते.
-०.४५ टक्के रुग्ण एचआयव्हीबाधित
नागपूर जिल्ह्यात २०१६-१७ मध्ये तपासण्यात आलेल्या ८९ हजार ४७९ संशयित रुग्णांमध्ये १.०१ टक्के रुग्ण एचआयव्हीबाधित आढळून आले होते; परंतु चार वर्षांत यात मोठी घट आली आहे. २०२०-२१ मध्ये तपासण्यात आलेल्या १ लाख ६ हजार ९६० रुग्णांमध्ये ०.४५ टक्के बाधित आढळून आले.
-गर्भवती मातांमध्ये एचआयव्हीबाधितांची टक्केवारी ०.०३ टक्के
२०१६-१७ मध्ये ६१ हजार २२२ गर्भवती मातांच्या करण्यात आलेल्या एचआयव्ही तपासणीत ०.०९ टक्के माता बाधित आढळून आल्या. २०१७-१८ मध्ये ८७ हजार ७१३ तपासणीतून ०.०६ टक्के, २०१८-१९ मध्ये ९४ हजार ९६१ तपासणीतून ०.०३ टक्के, २०१९-२० मध्ये १ लाख ६ हजार ६७ तपासणीतून ०.०३ टक्के, तर २०२०-२१ मध्ये ८४ हजार ९४ मातांच्या तपासणीतून ०.०३ टक्के माता बाधित आढळून आल्या.
-५० टक्के एचआयव्हीबाधित गर्भवती महिला २५ ते ३४ वयोगटातील
मागील ५ वर्षांत २ लाख ७३ हजार ८५३ गर्भवती मातांची तपासणी करण्यात आली. यात २५ ते ३४ वयोगटातील महिलांची टक्केवारी ५०.४३ टक्के आहे. त्या खालोखाल २० ते २४ वयोगटात ४२.१ टक्के, १५ ते १९ वयोगटात ४.८२ टक्के, तर ३५ वरील वयोगटात २.६३ टक्के आहे.
५ वर्षांतील एचआयव्हीबाधित वयोगट
१४ वर्षांखालील : ३.२८ टक्के
१५ ते २४ वयोगट : ६.९३ टक्के
२५ ते ३४ वयोगट : २१.९६ टक्के
३५ ते ४९ वयोगट : ४७.२३ टक्के
५० व त्यावरील : २०.५७ टक्के
तरुण वयोगटात एचआयव्हीची लक्षणे दिसून येत नाहीत; परंतु याचे संक्रमण होऊन ५ ते १० वर्षे झाल्यानंतर लक्षणे दिसून येतात. यामुळे ३५ वरील वयोगटात एचआयव्हीबाधितांची संख्या अधिक आहे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, हे वय लग्नाचे असते. गर्भवती मातांची तपासणीत आपण त्यांच्या पतीचीही तपासणी करतो. यामुळे या वयोगटात बाधितांची संख्या मोठी दिसून येते.
-तनुजा फाले, कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, नागपूर