जागतिक स्मृतिभ्रंश दिन; नियमित व्यायाम व आरोग्यपूर्ण जीवनशैलीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 10:36 AM2019-09-21T10:36:52+5:302019-09-21T10:37:19+5:30

आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरात अल्झायमर आणि संबंधित आजार असलेल्या लोकांची संख्या ४८ दशलक्ष एवढी आहे. ही संख्या दर २० वर्षांनी दुप्पट होऊ शकते.

World Amnesia Day; The need for regular exercise and a healthy lifestyle | जागतिक स्मृतिभ्रंश दिन; नियमित व्यायाम व आरोग्यपूर्ण जीवनशैलीची गरज

जागतिक स्मृतिभ्रंश दिन; नियमित व्यायाम व आरोग्यपूर्ण जीवनशैलीची गरज

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप म्हणजेच आरोग्यपूर्ण जीवनशैलीने स्मृतिभ्रंश दूर ठेवता येऊ शकतो. या आजारावर औषध नसले तरी, काही औषधांनी लक्षणे कमी करता येऊ शकतात, अशी माहिती, प्रसिद्ध मेंदूरोग तज्ञ डॉ चंद्रशेखर मेश्राम यांनी जागतिक स्मृतिभ्रंश दिवसाच्या पूर्वसंध्येला दिली.
लोकमतशी बोलताना डॉ. मेश्राम म्हणाले, ‘अल्झायमर’ रोगात प्रामुख्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. या रुग्णाची स्पष्टपणे विचार करण्याची क्षमता नाहिशी होते. हा आजार वयाच्या ३० व्या वर्षी देखील होऊ शकतो. पण, ६० वर्षांनंतर या आजाराचे निदान होतं. तसंच वाढत्या वयाबरोबर हा आजार होण्याचा धोका वाढतो.जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरात अल्झायमर आणि संबंधित आजार असलेल्या लोकांची संख्या ४८ दशलक्ष एवढी आहे. ही संख्या दर २० वर्षांनी दुप्पट होऊ शकते. एकट्या भारतात, साडे चार दशलक्ष लोकांमध्ये अल्झायमरचा एखादा प्रकार आढळून आला आहे. भारतात आलेल्या आधुनिक वैद्यकीय क्रांतीमुळे भारतीयांचे जीवनमान ८० च्या पुढे जात असून या वयातील लोकसंख्येच्या ४० टक्के लोक या आजाराने ग्रस्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ५ टक्के लोकांना कमी वयात हा आजार होऊ शकतो.
स्मृतिभ्रंश हा वाढत्या वयानुसार वाढत जातो. पण, भारतात आजही ५० टक्क्याहून अधिक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हा आजार गांभीर्याने घेत नाहीत. ‘अल्झायमर’ रोगाचे सुरुवातीला निदान करणे कठीण असते. वाढत्या वयामुळे होणारा विसराळूपणा समजून त्याकडे दुर्लक्ष होते. पण, वार्धक्य आणि आनुवंशिकता यामुळे हा रोग होण्याची शक्यता असते.

हळूहळू आजाराची तीव्रता वाढते
आजारामध्ये स्मरणशक्ती हळूहळू कमी होते, तर्कसंगत विचार करण्याची शक्ती-क्षमता कमी होते, निर्णय क्षमतेवर परिणाम होतो व कालांतराने दैनदिन काम करणेही कठीण होते. हळूहळू आजाराची तीव्रता वाढत जाते.

चाळिशीनंतर विशेष लक्ष द्या
चाळिशीपासूनच योग्य जीवनशैली अंगिकारणे जास्त महत्वाचे आहे. अशांनी वेळच्या वेळी जेवण, झोप व व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायामामध्ये दमश्वासाचे व्यायाम, स्नायूंना बळकटी देणारे, लवचिकता आणणारे व व्यक्तीची चिकाटी वाढवणारे शारीरिक व्यायाम गरजेचे आहे.

असा ठेवा आहार
या आजारात आहाराचे फार महत्त्व आहे. मेंदू हा चरबीने बनलेला असतो. यामुळे चांगले चरबीयुक्त आहार घेणे आवश्यक असते. जेवणात सोयाबीन तेल, वनस्पती तेल, सुर्यमुखी तेलाचा वापर करू नये. या ऐवजी नारळ तेल, बटर, शेंगदाणा तेल, ऑलिव्ह ऑईल तेलाचा वापर करावा. साखर आणि साखरेचे पदार्थ टाळावे. सुक्या मेवाचा आहारात समावेश करावा. जास्तीत जास्त भाज्या खाव्यात. भात आणि पोळी जेवढी कमी खाता येईल तेवढे चांगले.अंडी न खाणाऱ्यांनी जीवनसत्व बी १२ वरून घ्यावे.

Web Title: World Amnesia Day; The need for regular exercise and a healthy lifestyle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य