जागतिक एंकीलॉसिंग स्पॉन्डीलायटिस दिन; पाठीचा कणा बांबूसारखा होणाऱ्या आजाराचा पुरुषांना धोका अधिक
By सुमेध वाघमार | Published: May 5, 2023 05:25 PM2023-05-05T17:25:02+5:302023-05-05T17:38:24+5:30
Nagpur News ‘एंकीलोसिंग स्पॉन्डीलायटी’ हा विशिष्ट प्रकाराचा वात रोग आहे. यात पाठीच्या कण्याची रचना एखाद्या बांबूप्रमाणे होते. एकूण लोकसंख्येपैकी ०.१ ते ०.२ टक्के लोकांमध्ये हा विकार जडण्याचे प्रमाण अधिक असते.
सुमेध वाघमारे
नागपूर : ‘एंकीलोसिंग स्पॉन्डीलायटी’ हा विशिष्ट प्रकाराचा वात रोग आहे. यात पाठीच्या कण्याची रचना एखाद्या बांबूप्रमाणे होते. ‘आॅटोइम्युनिटी’ आणि काही अज्ञात कारणांनी हा विकार जडतो. एकूण लोकसंख्येपैकी ०.१ ते ०.२ टक्के लोकांमध्ये हा विकार जडण्याचे प्रमाण अधिक असते. हा वातरोग महिलांच्या तुलनेत पुरुषांना होण्याचा धोका पाच पटीने अधिक असतो. ६ मे रोजी जगभरात एंकीलॉसिंग स्पॉन्डीलायटिस जनजागृती दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याच्या पूर्वसंध्येला वातरोग तज्ज्ञ व अस्थिरोग तज्ज्ञानी पत्रकारांशी संवाद साधला.
-काय आहे, एंकीलॉसिंग स्पॉन्डीलायटिस
संधिवात तज्ज्ञ डॉ. सौरभ चहांदे म्हणाले, एंकीलॉसिंग स्पॉन्डीलायटिसमध्ये रुग्णाच्या पाठीच्या कणा आणि अस्थिबंद यावर (लिगामेंट्स) दाह आणि सूज येते. दोन मनक्याच्या दरम्यान हळूहळू नव्या हाडाची निर्मिती होते आणि ते कालांतराने ते एकमेकांना चिटकू लागतात. उपचार करवून घेतले नाही तर पुढे सगळे मणके एक होतात व त्यामुळे समोर-मागे, आजुबाजूला वाकण्यास त्रास होतो. एक्स-रे मध्ये बघितल्यास पाठीच्या कण्याची रचना एखाद्या बांबूप्रमाणे दिसते. त्यामुळे जीवनभर व्यंग येऊ शकते.
-औषधोपचार व फिजीओथेरपीने व्यंग टाळता येतो
आजाराचे वेळीच निदान होऊन वातरोगतज्ज्ञाच्या सल्ल्याने औषध घेतले, जीवनशैलीतील बदल व फिजियोथेरपीचा अवलंब केल्यास पाठीचा कणा बांबूसारखा होण्यापासून टाळता येतो. त्यामुळे पुढील व्यंग देखील टाळता येते.
-ही आहेत लक्षणे
कंबर दुखणे, पार्श्वभावात आलटून-पालटून वेदना होणे, मांड्यांमध्ये वेदना होणे ही प्राथमिक लक्षण आहेत. मुख्य म्हणजे या वेदना मध्यरात्री आणि पहाटेच्या वेळी अधिक असतात. सकाळी कंबरेत अकडण राहणे व जसजसा दिवस पुढे जातो; अकडण कमी होऊ लागणे अशी लक्षणे दिसून येतात. रात्री कड बदलताना त्रास होतो. पुढे या वेदना मानेपर्यंत पोहचतात. याशिवाय थकवा, वारंवार लालसर डोळे, छातीत वेदना ही लक्षणेही आढळून येऊ शकतात.