जागतिक दमा दिन : धुळीमुळे ६० टक्के दम्याचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 12:13 AM2019-05-01T00:13:37+5:302019-05-01T00:14:55+5:30
जगात सुमारे १५० दशलक्ष लोक दम्याच्या आजाराने पीडित आहेत, तर भारतात १५ ते २० दशलक्ष लोकांमध्ये हा आजार दिसून येतो. धुळीमुळे दमा होण्याची शक्यता ५० ते ६० टक्के असते. सध्या नागपुरात मेट्रो, सिमेंट रस्ते व इमारतीचे बांधकाम प्रचंड प्रमाणात सुरू आहे. यातून उडणाऱ्या धुळीमुळे व वाहनांतून निघणाºया विषारी धुरांमुळेही अस्थमा म्हणजे दम्याचे रुग्ण वाढत आहे. विशेषत: ५ ते ११ वयोगटातील १० ते १५ टक्के मुले या आजाराच्या विळख्यात सापडत असल्याचे धक्कादायक चित्र असल्याचे श्वसनरोग तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगात सुमारे १५० दशलक्ष लोक दम्याच्या आजाराने पीडित आहेत, तर भारतात १५ ते २० दशलक्ष लोकांमध्ये हा आजार दिसून येतो. धुळीमुळे दमा होण्याची शक्यता ५० ते ६० टक्के असते. सध्या नागपुरात मेट्रो, सिमेंट रस्ते व इमारतीचे बांधकाम प्रचंड प्रमाणात सुरू आहे. यातून उडणाऱ्या धुळीमुळे व वाहनांतून निघणाºया विषारी धुरांमुळेही अस्थमा म्हणजे दम्याचे रुग्ण वाढत आहे. विशेषत: ५ ते ११ वयोगटातील १० ते १५ टक्के मुले या आजाराच्या विळख्यात सापडत असल्याचे धक्कादायक चित्र असल्याचे श्वसनरोग तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
दमा आजाराविषयी माहिती देताना वरिष्ठ पल्मोनोलॉजिस्ट डॉ. अशोक अरबट म्हणाले, दम्यासाठी धोकादायक घटक म्हणजे, घरातील गादी, कार्पेटवरील धूळ, घरातील पाळीव प्राण्यांचे केस, बाहेर परिसरातील धूळ, रासायनिक धूर यामुळे दम्यात वाढ झाली आहे. सोबतच वातावरणातील सतत होत असलेला बदलही या आजाराला कारणीभूत ठरत आहे.
मृत्यूचे प्रमाण पाच ते सात टक्के -डॉ. अरबट
डॉ. अरबट म्हणाले, ज्यांची श्वसननलिका ही सामान्यांच्या तुलनेत जास्त संवदेनशील, प्रभावित होणारी आणि नाजुक असते ते धूळ आणि धूरच्या संपर्कात येताच त्यांची श्वसननलिका आकुंचन पावते. श्वसननलिकेवर सूज येते. कफ बाहेर पडतो. परिणामी रुग्णाला धाप लागते, खोकला येतो, छातीतून घरघर आवाज येतो. एकूणच श्वसनप्रक्रिया सामान्य राहत नाही यालाच अस्थमा (दमा) म्हणतात. अशा रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळोवेळी उपचार घेतल्यास सामान्य जीवन जगता येते. परंतु दुर्लक्ष केल्यास हाच आजार गंभीर होऊ शकतो. दम्याच्या मृत्यूचे प्रमाण पाच ते सात टक्के आहे.
अस्थमा असतानाही धूम्रपान केल्यास ‘सीओपीडी’ची भीती -डॉ. मेश्राम
मेडिकलच्या श्वसनरोग विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम म्हणाले, ‘सीओपीडी’ व ‘अस्थामा’च्या रुग्णांची काही लक्षणे सारखीच असतात. यामुळे रुग्णांची योग्य तपासणी करून निदान करणे आवश्यक ठरते. हे दोन्ही आजार असलेल्या ‘अॅकॉस’चे रुग्ण वाढत आहे. विशेष म्हणजे, अस्थमा असतानाही धूम्रपान केल्यास व औषधे योग्य पद्धतीने न घेतल्यास पुढे ‘सीओपीडी’ होण्याची शक्यता असते. अस्थमावर योग्य औषधोपचार केल्यास तो बरा होऊ शकतो, परंतु सीओपीडी बरा होत नाही त्याला नियंत्रणात ठेवता येते.
दमा मोजण्यासाठी ‘पीक एक्सपीरेटरी फ्लो रेट’-डॉ. मिश्रा
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. ज्ञानशंकर मिश्रा म्हणाले, दमा मोजण्यासाठी ‘पीक एक्सपीरेटरी फ्लो रेट’चा उपयोग केला जातो. आता यात ‘स्पायरोमीटर’ही आले आहे. ‘पीक फ्लो रेट’ कमी आल्यास ‘लंग फंक्शन टेस्ट’ केली जाते. त्यानंतर आवश्यक औषधोपचार केला जातो. ज्या रुग्णाला दमा आहे त्यांना घरी ‘पीक एक्सपीरेटरी फ्लो रेट’चा वापर करून दम्याचे ‘मॉनेटरींग’ करता येते. दमा वाढल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधांचे डोजही वाढवितात येतात. यामुळे अस्थमाचा अटॅक येण्याचा धोका कमी होतो.
दम्यासाठी धोकादायक घटक
- घरातील गादी, कार्पेट व इतर धूळ, मांजराचे केस, झुरळ व इतर किडे
- घराबाहेरील परागकण
- तंबाखूचा धूर, रासायनिक धूर
- नाक, घसा व फुफ्फुसातील जंतुसंसर्ग
- वारंवार होणारी सर्दी
- भावनिक उद्वेग, शारीरिक परिश्रम
- आधुनिक शहरीकरण.