जागतिक दमा दिवस : कोरोना संक्रमणात दम्याचा रुग्णांनो काळजी घ्या : डॉक्टरांचा सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 06:55 PM2020-05-04T18:55:02+5:302020-05-04T18:56:16+5:30
दम्याचा व दम्याचा पूर्व इतिहास असलेल्या व्यक्तीला निश्चितपणे या काळात अधिक काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे नागपुरातील नामवंत श्वसनरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोविड-१९’च्या रुग्णांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना व दमा दोन्ही फुफ्फुसांशी निगडित आजार आहेत. यामुळे दम्याचा व्यक्तीला लागण झाल्यास जीवाला धोका होऊ शकतो, अशी भीती अनेकांच्या मनात आहे. विशेष म्हणजे, या विषयाची शास्त्रीय माहिती अद्यापही समोर आली नाही. यामुळे गैरसमज वाढले आहेत. परंतु दम्याचा व दम्याचा पूर्व इतिहास असलेल्या व्यक्तीला निश्चितपणे या काळात अधिक काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे नागपुरातील नामवंत श्वसनरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कोरोना व दमा फुफ्फुसाशी निगडित आजार-डॉ. बल्की
छातीरोग तज्ज्ञ डॉ. आकाश बल्की म्हणाले, कोरोना व दमा दोघांचे आश्रय फुफ्फुस आहे, हे सत्य आहे. परंतु सध्या भारतात दम्याचा ‘सीझन’ नाही, हे लक्षात घ्यायला हवे. साधारणपणे पावसाळ्याच्या सुरुवातीला, ढगाळ वातावरण, दमट हवामान व वातावरण अशुद्ध असल्याने दम्याचा वेग वाढतो. अशावेळी श्वासनलिका आकुंचित पावतात. परंतु योग्य उपचाराने पूर्व स्थितीतही येतात. कोरोनाच्या प्रादुभार्वामध्ये कोरोनाची लागण झाल्यानंतर अगोदर जर योग्य चिकित्सा झाली नसेल, इतर व्याधींचा संसर्ग वाढतो. यातच मधुमेहावर नियंत्रण नसेल, तर फुफ्फुसांवर त्याचा प्रभाव होऊन त्याचे कार्य कमी होते. श्वास घेण्यास त्रास होतो. यामुळे दम्याचा व त्याचा पूर्व इतिहास असलेल्या व्यक्तीला निश्चितपणे अधिक काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
लक्षणे सारखीच असल्याने काळजी आवश्यकच-डॉ. अरबट
श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट म्हणाले, दमा आणि कोरोनाची जवळपास सारखीच लक्षणे असतात. जसे खोकला येणे व दम लागणे. छातीत इन्फेक्शन झाल्यास तापही येऊ शकतो. यामुळे दम्याच्या रुग्णांनी लक्षणे दिसताच डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. न्युमोनिया झाला असल्यास ‘कोविड-१९’ चाचणी करणे आवश्यक आहे. प्रत्येक दम्याच्या रुग्णांनी आपल्या आजाराची माहिती डॉक्टरांना द्यायला हवी. यामुळे अधिक काळजी घेतली जाईल. या शिवाय, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले असल्यास त्यांनी तपासणी करून घेणेही आवश्यक आहे.