दीक्षाभूमी होणार जागतिक आकर्षण

By admin | Published: October 18, 2015 03:32 AM2015-10-18T03:32:45+5:302015-10-18T03:32:45+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षा घेतलेल्या या पावनभूमीला जागतिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

World Attraction will be organized in the region | दीक्षाभूमी होणार जागतिक आकर्षण

दीक्षाभूमी होणार जागतिक आकर्षण

Next

देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन : सभागृह, संशोधन केंद्र व ग्रंथालयाचे उद््घाटन
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षा घेतलेल्या या पावनभूमीला जागतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. दीक्षाभूमीवरील स्मारकाची ही पवित्र वास्तू पूर्ण झाली असल्यामुळे जागतिक पर्यटन तसेच बौद्ध उपासकांचे ते आकर्षणाचे केंद्र बनले आहे. दीक्षाभूमीवरील पायाभूत सुविधाही जागतिक दर्जाच्या राहाव्यात, यासाठी दीक्षाभूमीवरील संपूर्ण परिसराचा ‘मास्टर प्लॅन’ तयार करून प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेला निधी सरकारकडून देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली.
दीक्षाभूमी परिसरात नागपूर सुधार प्रन्यासतर्फे परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, संशोधन केंद्र आणि ग्रंथालयाचे उद्घाटन तसेच हस्तांतरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, आ. जोगेंद्र कवाडे, आ. प्रकाश गजभिये, आ. अनिल सोले, आ. डॉ. मिलिंद माने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई, सचिव सदानंद फुलझेले, विभागीय आयुक्त अनुप कुमार, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्याम वर्धने, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मनपा अयुक्त श्रावण हर्डीकर, स्मारक समितीचे सदस्य डॉ. राजेंद्र गवई आणि विलास गजघाटे व्यासपीठावर होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सभागृहासह संशोधन केंद्र व ग्रंथालयाची चावी देऊन ही इमारत स्मारक समितीला हस्तांतरित केली.
पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी स्मारक समितीच्या सूचनेनुसार नागपूर सुधार प्रन्यासने आराखडा तयार करून शासनाला सादर करण्याच्या सूचना करीत मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या वतीने जागतिक पर्यटकांचे मुख्य आकर्षण केंद्र म्हणून या परिसराचा विकास करण्यात येईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्ष समता वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार असून, तीन वर्षात ४५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. या तीन वर्षात राज्यात पथदर्शी कामे व्हावी, अशा पद्धतीने नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नितीन गडकरी म्हणाले, दीक्षाभूमी परिसरात अत्याधुनिक सुविधा असलेले सभागृह तसेच ई-ग्रंथालय आदी सुविधा या नागपूरच्या सामाजिक व सांस्कृतिक विकासासाठी पोषक ठरणार असून हे केंद्र वैचारिक आणि संशोधनात्मक कार्यासाठी वापर व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करताना या सभागृहाचे भाडे सर्वांना परवडेल असेच असावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई आणि सचिव सदानंद फुलझेले यांनी शासनासह नासुप्रचे आभार व्यक्त केले.
नासुप्रचे सभापती श्याम वर्धने यांनी प्रास्ताविक केले. संचालन रेणुका देशकर यांनी केले. नासुप्रचे अधीक्षक अभियंता सुनील गुज्जेलवार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

चिचोलीतील वास्तूसंग्रहालयाचेही लवकरच भूमिपूजन
सामाजिक न्याय विभागाच्यावतीने चिचोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वास्तुसंग्रहालयाचा विकासही अत्याधुनिक पद्धतीने करण्यात येणार आहे. चिचोलीतील वास्तुसंग्रहालयाच्या इमारतीचे भूमिपूजनही लवकरच करण्यात येईल, असे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी यावेळी सांगितले.

Web Title: World Attraction will be organized in the region

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.