जागतिक मेंदू दिन विशेष : मेंदू सांभाळा! तरुणांमध्येच मृत्यू व अपंगत्व अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2022 11:54 AM2022-07-22T11:54:31+5:302022-07-22T12:38:15+5:30

रस्ता अपघातात ६० टक्के; तर, २५ टक्के उंचावरून पडल्याने मेंदूला मार

World Brain Day 2022 : brain stroke death and disability are higher among the young | जागतिक मेंदू दिन विशेष : मेंदू सांभाळा! तरुणांमध्येच मृत्यू व अपंगत्व अधिक

जागतिक मेंदू दिन विशेष : मेंदू सांभाळा! तरुणांमध्येच मृत्यू व अपंगत्व अधिक

Next

नागपूर : मानवी शरीराचा सर्वांत महत्त्वाचा अवयव मेंदू हा मानवी कवटीच्या आत अत्यंत सुरक्षित असला, तरी दरवर्षी मेंदूला इजा होऊन मृत्यू व अपंगत्व येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यात १५ ते ४५ वयोगटाचे प्रमाण सर्वाधिक आहे. या मागे ६० टक्के रस्ता अपघात हे मुख्य कारण आहे, अशी माहिती मेंदूरोग शल्यचिकित्सक डॉ. अक्षय पाटील यांनी दिली. २२ जुलै हा दिवस जागतिक मेंदू दिन म्हणून पाळला जातो. त्या निमित्ताने ते ‘लोकमत’शी बोलत होते.

डॉ. पाटील म्हणाले की, डोक्याला आणि पर्यायाने मेंदूला होणारी इजा ही रस्ते अपघात व उंचावरून पडल्याने होते. डोक्याला होणाऱ्या एकूण इजेपैकी ६० टक्के रस्ते अपघातातून, तर २५ टक्के उंचावरून पडल्याने होते. उर्वरित १० टक्के इजांसाठी भांडण व मारामाऱ्या कारणीभूत आहेत. याशिवाय १० ते १५ टक्के इजांमध्ये मद्यपानाच्या प्रभावात झाल्याचेही दिसून येते.

रक्त पातळ करणारी औषधी घेणाऱ्यांनो सावधान

डॉ. पाटील म्हणाले की, रक्त पातळ करणारी औषधी घेत असलेल्यांचे डोके थोडेही धडकले तर इजा होते. यामुळे दुचाकी चालविताना या रुग्णांनी अधिक सांभाळून व हेल्मेटचा वापर करायला हवा.

रस्ते अपघातात पहिल्या दोन तासांतच ५० टक्के मृत्यू

रस्ते अपघातामध्ये मृत्यू होणाऱ्यांपैकी ५० टक्के लोकांचा मृत्यू पहिल्या दोन तासांमध्येच होतो. आणि त्यासाठी मेंदूला होणारी इजा कारणीभूत ठरते. इजा झाल्याने मेंदूमधील ताण वाढून श्वास घेणे, रक्तदाब नियंत्रणात ठेवणे व अन्य अशा जीवनावश्यक क्रियांना नियंत्रित करणाऱ्या केंद्रांवर दाब वाढून मृत्यू देखील ओढावू शकतो.

अशी होते गुंतागुंत

मेंदूच्या उजव्या भागाला इजा झाली, तर डाव्या बाजूच्या हातापायांची ताकद जाते, रक्तस्राव झाल्याने किंवा मेंदूला इजा झाल्याने फिट येते व हातापायाची ताकद कमी होते. डाव्या बाजूच्या मेंदूला इजा झाली तर, बोलण्यात फरक किंवा बोलता न येणे अशा गोष्टींसह गोष्ट न समजणे, चिडचिड वाढणे, बुद्धी संबंधित प्रश्न निर्माण होते. डोळ्याचा रक्तवाहिनीला मार लागला तर दृष्टी कमी होणे वगैरे सारखी गुंतागुंत होऊन कायम अपंगत्व देखील येऊ शकते.

- मेंदूला होणारी इजा टाळता येणारी 

एका अभ्यासावरून ८० टक्के अपघात मानवी चुकांमुळे होतात. वाहतूक नियमांचे पालन केल्यास, दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर केल्यास किंवा कार चालविताना सीट बेल्टचा वापर केल्यास अपघातामुळे मेंदूला होणारी इजा टाळता येते. अन्य मेंदूविकारांवर अनेकदा आपले नियंत्रण नसले तरी डोक्याला मार लागून होणाऱ्या मेंदूविकारांवर आपण बऱ्यापैकी नियंत्रण मिळवू शकतो.

-डॉ. अक्षय पाटील, मेंदूरोग शल्यचिकित्सक

Web Title: World Brain Day 2022 : brain stroke death and disability are higher among the young

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.