जागतिक मेंदू दिन : गावखेड्यांमध्ये वाढतोय पार्किन्सनचा आजार : चंद्रशेखर मेश्राम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 09:18 PM2020-07-21T21:18:35+5:302020-07-21T21:20:00+5:30
पार्किन्सनचा आजार सर्वच वयोगटात दिसून येतो. परंतु ६० वर्षांवरील १०० लोकांपैकी एकाला हा आजार होतो. भारतात या आजाराचे सहा ते सात लाख रुग्ण आहेत. दहा वर्षांनंतर हे प्रमाण दुप्पट होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पार्किन्सनचा आजार सर्वच वयोगटात दिसून येतो. परंतु ६० वर्षांवरील १०० लोकांपैकी एकाला हा आजार होतो. भारतात या आजाराचे सहा ते सात लाख रुग्ण आहेत. दहा वर्षांनंतर हे प्रमाण दुप्पट होण्याची शक्यता आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये याचे प्रमाण दीडपटीने जास्त आहे. धक्कादायक म्हणजे, हा आजार गावातील लोकांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येत असल्याची माहिती वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीच्या ट्रॉपिकल न्यूरोलॉजी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली. वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीतर्फे २२ जुलै हा दिवस वार्षिक जागतिक मेंदू दिवस म्हणून पाळला जातो. या वर्षी हा दिवस पार्किन्सन आजाराची जनजागृती व रुग्णांचे जीवनमान सुधारण्यासाठी समर्पित करण्यात आला आहे. या कार्यात १२६ हून अधिक जागतिक संघटना सहभागी आहेत.
डॉ. मेश्राम म्हणाले, पार्किन्सन हा एक मेंदूचा आजार आहे. जो मन, शरीराच्या हालचाली आणि मेंदूच्या कार्याच्या जवळजवळ सर्व बाबींवर प्रभाव पाडतो. पार्किन्सन ही जागतिक समस्या आहे. जागतिक मेंदू दिनाचे अध्यक्ष प्राध्यापक टिसा विजरतने यांनी स्पष्ट केले की, ‘पार्किन्सन’ने जगभरातील सात दशलक्षाहूनही अधिक लोकांना प्रभावित केले आहे. यामुळे आजाराची जनजागृती होणे व रुग्णांना उपचाराखाली आणणे आवश्यक आहे.
२५ टक्के रुग्णांचे चुकीचे निदान
डब्ल्यूएफएनचे सरचिटणीस प्रा. वोल्फगँग ग्रिसोल्ड म्हणाले, पार्किन्सन आजाराची सुरुवातीला लक्षणे ओळखू येत नाहीत. त्यामुळे २५ टक्के रुग्णांचे निदान चुकीचे होते. डब्ल्यूएफएनचे अध्यक्ष प्रा. विल्यम कॅरोल म्हणाले, मेंदूचे आरोग्य यापूर्वी कधीही इतके महत्त्वाचे नव्हते जेवढे आज आहे. प्रा. कॅरोल म्हणाले, पार्किन्सन रोगावर एकत्रित संशोधन करणे आवश्यक आहे.
पार्किन्सनची लक्षणे
पार्किन्सन आजाराची विशिष्ट लक्षणे म्हणजे कंपन आणि शरीराच्या हालचालीतील संथपणा. याशिवाय झोप आणि संज्ञानात्मक क्षमतेमध्ये व्यत्यय येणे, पोटाचे विकार, बद्धकोष्ठपणा, चिंता आणि नैराश्य. या लक्षणांमुळे जीवनाची गुणवत्ता कमी होते. लवकर निदान आणि प्रभावी उपचार केल्यास रुग्णांना आराम मिळतो. जीवनमान चांगले होते.
उपचाराच्या पर्यायांवर चर्चा
नागपूर न्यूरो सोसायटी, ऑरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशन, मानसोपचार संस्था, नागपूर आणि सप्तक संघटनेच्यावतीने ६ ते ७. ३० दरम्यान डॉ. मेश्राम, डॉ. ध्रुव बत्रा, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सुधीर भावे रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या उपचाराच्या पर्यायांवर चर्चा करतील. आहार सल्लागार जयश्री पेंढारकर या रुग्णांना योग्य आहाराबद्दल सल्ला देतील आणि फिजिओथेरपिस्ट डॉ. शीतल मुंदडा व्यायामाचे महत्त्व विशद करतील. न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. लोकेंद्रसिंह, डॉ. श्याम बाभुळकर, डॉ. नितीन चांडक हे यावेळी उपस्थित राहणार आहेत.