‘ड्रॅगन पॅलेस’ येथे जागतिक बौद्ध धम्म शांती परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 11:13 PM2018-10-13T23:13:12+5:302018-10-13T23:19:54+5:30
६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने ओगावा सोसायटी निर्मित मध्यभारतातील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल, कामठी येथे १७ व १८ आॅक्टोबरला दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म शांती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत जपान, थायलंड, श्रीलंका, म्यानमार, बांग्लादेश, तिबेट, व्हिएतनाम, नेदरलँडसह जगभरातील भिक्खू व बौद्ध विचारवंत प्रतिनिधींचा सहभाग राहील, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्यक आयोगाच्या सदस्या व माजी राज्यमंत्री अॅड. सुलेखा कुंभारे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने ओगावा सोसायटी निर्मित मध्यभारतातील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल, कामठी येथे १७ व १८ आॅक्टोबरला दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म शांती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत जपान, थायलंड, श्रीलंका, म्यानमार, बांग्लादेश, तिबेट, व्हिएतनाम, नेदरलँडसह जगभरातील भिक्खू व बौद्ध विचारवंत प्रतिनिधींचा सहभाग राहील, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्यक आयोगाच्या सदस्या व माजी राज्यमंत्री अॅड. सुलेखा कुंभारे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.
१७ आॅक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म शांती परिषदेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय महाबोधी मेडिटेशन सेंटर, लेह-लद्दाख, जम्मू-काश्मीरचे संस्थापक अध्यक्ष पुज्य भदंत संघसेना यांच्या हस्ते करण्यात येईल. अध्यक्षस्थानी महाबोधी सोसायटी आॅफ इंडिया, बौद्धगयाचे उपाध्यक्ष पुज्य भदंत डॉ. वरसंबोधी राहतील. विशेष अतिथीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री (सामाजिक न्याय व अधिकारिता) रामदास आठवले व महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांची उपस्थिती राहणार आहे.
१८ आॅक्टोबर रोजी समापन सोहळा दुपारी १२.३० वाजता होणार असून मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री के़ जे़ अल्फॉन्स (स्वतंत्र प्रभार), जिल्ह्याचे पालकमंत्री चंदशेखर बावनकुळे, राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोगाचे अध्यक्ष सय्यद गेहरूल हसन रिजवी यांची उपस्थिती राहणार आहे. पत्रपरिषदेत नगरसेविका वंदना भगत उपस्थित होत्या.
- ३०० बसेसची व्यवस्था
धम्मचक्र सोहळा व धम्म परिषदेच्या अनुषंगाने दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेस पर्यंत ३०० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे़ तसेच ड्रॅगन पॅलेसमध्ये येणाऱ्या अनुयायांसाठी २४ तास विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यात भोजनदान, अल्पोपहार, आरोग्य आदी व्यवस्था करण्यात आली आहे.
--------