‘ड्रॅगन पॅलेस’ येथे बुधवारपासून जागतिक बौद्ध धम्म शांती परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 11:29 PM2018-10-16T23:29:28+5:302018-10-16T23:30:28+5:30
६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने ओगावा सोसायटीतर्फे ड्रॅगन पॅलेस टेम्पल, कामठी येथे १७ व १८ आॅक्टोबरला दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म शांती परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत जपान, थायलंड, श्रीलंका, म्यानमार, बांग्लादेश, तिबेट, व्हिएतनाम, नेदरलँडसह जगभरातील भिक्खू व बौद्ध विचारवंत प्रतिनिधींचा सहभाग असेल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने ओगावा सोसायटीतर्फे ड्रॅगन पॅलेस टेम्पल, कामठी येथे १७ व १८ आॅक्टोबरला दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म शांती परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत जपान, थायलंड, श्रीलंका, म्यानमार, बांग्लादेश, तिबेट, व्हिएतनाम, नेदरलँडसह जगभरातील भिक्खू व बौद्ध विचारवंत प्रतिनिधींचा सहभाग असेल.
१७ आॅक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म शांती परिषदेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय महाबोधी मेडिटेशन सेंटर, लेह-लद्दाख, जम्मु-काश्मीरचे संस्थापक अध्यक्ष भदंत संघसेना यांच्या हस्ते करण्यात येईल. अध्यक्षस्थानी महाबोधी सोसायटी आॅफ इंडिया, बौद्धगयाचे उपाध्यक्ष भदंत डॉ. वरसंबोधी राहतील. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले हे विशेष अतिथी राहतील. यानंतर ‘जागतिक शांती, मैत्री व मानव कल्याणाकरिता बौद्ध धम्माची आवश्यकता’ या विषयावर परिसंवाद होईल. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादात भिक्खुनी मायाआॅन कातायामा (जपान) भदंत मेधंकर (श्रीलंका), भदंत सयाडो शिरींघ (म्यानमार), भदंत थीच नाट टू (व्हिएतनाम), भदंत ,सोबिता (नेदरॅण्ड), भदंत पालडेल नामग्याल (तिबेट) आणि भदंत प्रमहा अनेक उदोम धम्मकित्ती (थायलँड) हे प्रमुख वक्ते राहतील.