जागतिक कर्करोग दिन; ‘हेड अ‍ॅण्ड नेक’ आणि स्तनाचा कर्करोग वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 11:10 AM2019-02-04T11:10:19+5:302019-02-04T11:10:43+5:30

कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराच्या मगरमिठीत सापडणाऱ्या लोकांची संख्या वाढतच चालली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कर्करोग विभागात २०१८ या वर्षात २४०० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

World Cancer Day; 'Head and neck' and breast cancer are growing | जागतिक कर्करोग दिन; ‘हेड अ‍ॅण्ड नेक’ आणि स्तनाचा कर्करोग वाढतोय

जागतिक कर्करोग दिन; ‘हेड अ‍ॅण्ड नेक’ आणि स्तनाचा कर्करोग वाढतोय

Next
ठळक मुद्देमेडिकलमध्ये कर्करोगाचे २४०० नवे रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराच्या मगरमिठीत सापडणाऱ्या लोकांची संख्या वाढतच चालली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कर्करोग विभागात २०१८ या वर्षात २४०० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यात पुरुषांमध्ये ‘हेडअ‍ॅण्ड नेक कॅन्सर’ तर महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग वाढत असल्याचे समोर आले आहे. ‘ग्लोबोकॉन २०१८’ अहवालानुसार गेल्या वर्षात भारतात स्तनाच्या कर्करोगाचे १,६२,४६८ (१४ टक्के) रुग्ण आढळून आले. ‘हेड अ‍ॅण्ड नेक’चे १,१९,९९२ (१०.४ टक्के), गर्भाशय कर्करोगाचे ९६,९२२ (८.४ टक्के), फुफ्फुस कर्करोगाचे ६७,७९५ (५.९ टक्के), पोटाच्या कर्करोगाचे ५७,३९४ (५ टक्के) रुग्ण तर इतर कर्करोगाचे ६,५२,७२३ (५६.४ टक्के) रुग्णांची नोंद झाली आहे.

देशात ७ लाख ८४ हजार रुग्णांचा मृत्यू
देशात २०१८ मध्ये ११,५७,२९४ कर्करोगाचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील ७ लाख ८४ हजार रुग्णांचे मृत्यू कर्करोगाने झाले आहेत. ७५ वर्षांवरील कर्करोगाच्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये अधिक आहे. पुरुषांमध्ये ७.३४ टक्के तर महिलांमध्ये हे प्रमाण ६.२८ टक्के आहे.

दुसऱ्या क्रमांकावर गर्भाशयाचा कॅन्सर
२०१४ मधील नागपुरातील कॅन्सरच्या आकडेवारीनुसार, इतर कॅन्सरच्या तुलनेत ‘हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सर’चे सर्वाधिक म्हणजे २२.७ टक्के रुग्ण होते. दुसऱ्या क्रमांकावर गर्भाशयाच्या कॅन्सरचे १५.१ टक्के तर स्तनाच्या कॅन्सरचे १४.९ टक्के रुग्ण होते. परंतु आता ‘हेड अ‍ॅण्ड नेक’ पहिल्या क्रमांकावर कायम असून दुसऱ्या क्रमांकावर स्तनाचा कर्करोग असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

कॅन्सर हॉस्पिटलचा प्रश्न रेंगाळलेलाच
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मेडिकलमधील कॅन्सर हॉस्पिटलचा प्रश्न गेल्या वर्षीही मार्गी लागलेला नाही. विशेष म्हणजे, शासनाने या हॉस्पिटलसाठी बांधकाम न करताच यंत्रसामुग्रीसाठी २० कोटी रुपये दिले आहेत. परंतु इमारत नसताना यंत्रसामुग्रीसाठी देण्यात आलेला हा निधी वादात सापडला आहे.

२५०ने वाढली कर्करोगाची ओपीडी
मेडिकलच्या कर्करोगातील बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) २०१५ मध्ये २२२५ नव्या रुग्णांची नोंद झाली. २०१६ मध्ये ही संख्या २१५७ होती, २०१७ मध्ये ही संख्या कायम असताना २०१८ मध्ये २५० ने वाढ होऊन २४०७ वर पोहचली आहे. यातील ७१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
-डॉ. अशोक दिवाण
प्रमुख कर्करोग विभाग, मेडिकल

कॅन्सर ‘नोटीफायबल डिसीज’नाही
राज्यात ‘एचआयव्ही’, स्वाईन फ्लू आदी रोगांच्या ‘नोटीफायबल डिसीज’ म्हणून नोंदी होतात. यामुळे या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनस्तरावर व्यापक प्रयत्न होतात, परंतु कर्करोग ‘नोटीफायबल डिसीज’मध्ये येत नाही. परिणामी कुठला कर्करोग वाढत आहे, किती रुग्ण आहेत याची नोंदच होत नसल्याने या रोगावरील नियंत्रणात शासन कमी पडत आहे.
-डॉ. कृष्णा कांबळे
कर्करोग विभाग, मेडिकल

Web Title: World Cancer Day; 'Head and neck' and breast cancer are growing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.