जागतिक कर्करोग दिन : विदर्भात ‘हेड ॲण्ड नेक' कॅन्सर वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2022 10:47 AM2022-02-04T10:47:51+5:302022-02-04T10:57:38+5:30

२०२१मध्ये मेडिकलमध्ये कोरोनामुळे केवळ १४ हजार ६८० कॅन्सरच्या नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यात जवळपास ३ हजारावर रुग्ण मुखाच्या कर्करोगाचे आहेत.

world cancer day : Head and Neck Cancer increasing in vidarbha | जागतिक कर्करोग दिन : विदर्भात ‘हेड ॲण्ड नेक' कॅन्सर वाढतोय

जागतिक कर्करोग दिन : विदर्भात ‘हेड ॲण्ड नेक' कॅन्सर वाढतोय

googlenewsNext
ठळक मुद्देहेड ॲण्ड नेक कॅन्सरची विदर्भ ‘राजधानी’मेडिकलमध्ये गेल्यावर्षी ३ हजारांवर मुखाच्या कर्करोगाचे रुग्ण

नागपूर : दरवर्षी भारतात कॅन्सरमुळे जवळपास १० लाख रुग्णांचा मृत्यू होतो. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत या रोगाच्या अकाली मृत्यूमध्ये महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. यात ‘हेड ॲण्ड नेक कॅन्सर’मध्ये विदर्भ ‘राजधानी’ ठरत असून, नागपुरात इतर कॅन्सरच्या तुलनेत याचे २२.७ टक्के रुग्ण आहेत. विशेष म्हणजे, २०२१मध्ये मेडिकलमध्ये कोरोनामुळे केवळ १४ हजार ६८० कॅन्सरच्या नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यात जवळपास ३ हजारावर रुग्ण मुखाच्या कर्करोगाचे आहेत.

भारतात ३४.६ टक्के लोक तंबाखूचे सेवन करतात. यात सिगारेट ओढणारे ५.७ टक्के, बिडी ओढणारे ९.२ टक्के, तर तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्यांची संख्या २५.९ टक्के आहे. महाराष्ट्रात हेच प्रमाण ३१.४ टक्के आहे. ३.४ टक्के लोक सिगारेट ओढतात, २.७ टक्के बिडी ओढतात, तर २७.६ टक्के मुले तंबाखूजन्य पदार्थ खातात. नागपुरात एक लाख लोकसंख्येच्या तुलनेत नव्याने आढळून येणाऱ्या कॅन्सरच्या रुग्णांमध्ये ४९.४ टक्के पुरुष रुग्ण हे तंबाखूशी संबंधित कॅन्सरचे आहेत; तर यात महिलांची टक्केवारी १८.२ टक्के आहे.

- मुखाच्या कर्करोगाची लक्षणे ओळखा - डॉ. दिवाण

मेडिकलच्या कर्करोग विभागाचे प्रमुख डॉ. अशोक दिवाण म्हणाले, कोरोनामुळे कॅन्सरचे फार कमी रुग्ण उपचारासाठी आले. २०१९ मध्ये २४,३४३ रुग्ण आले असताना २०२१ मध्ये ही संख्या १४,६८० आली. यातही २० टक्के रुग्ण मुखाच्या कॅन्सरचे आहेत. यामुळे या कॅन्सरची लक्षणे ओळखणे गरजेचे आहे.

- मुखाच्या कर्करोगाचे २३ टक्के रुग्ण - डॉ. मानधनिया 

कर्करोगतज्ज्ञ डॉ. सुशील मानधनिया म्हणाले, मानधनिया कॅन्सर रुग्णालयात मागील तीन वर्षांत विविध कर्करोगांचे ४,६०८ रुग्ण उपचारासाठी आले. यातील २३ टक्के म्हणजे १,०५० रुग्ण हे मुखाच्या कर्करोगाचे होते. याशिवाय, स्तनाच्या कर्करोगाचे ७६५, फुप्फुसाच्या कर्करोगाचे २४६, गर्भाशयाच्या मुखाचे १५२, तर पोटातील आतड्याच्या कर्करोगाचे १४१ रुग्ण होते.

- २५ ते ३० टक्के रुग्ण स्तनाच्या कर्करोगाचे - डॉ. प्रसाद

कर्करोग तज्ज्ञ डॉ. सौरभ प्रसाद म्हणाले, एकूण कर्करोगात ‘हेड ॲण्ड नेक’चे ३० ते ३५ टक्के रुग्ण आढळून येतात; परंतु स्तनांच्या कर्करोगाचे २५ ते ३० टक्के, तर गर्भाशयाच्या मुखाचे २० ते २५ टक्के रुग्ण आढळून येत असल्याने महिलांमध्ये या दोन्ही कर्करोगांची टक्केवारी ५० टक्क्यांवर जात असल्याने महिलांनी अधिक जागरूक राहणे व वेळीच उपचार घेणे आवश्यक आहे.

-एकूण कॅन्सरच्या रुग्णांत ३३ टक्के रुग्ण भारतातील - डॉ. डोंगरे

कर्करोगतज्ज्ञ डॉ. अमोल डोंगरे म्हणाले, भारतात कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. जगभरातील १०० कॅन्सरच्या रुग्णांत ३३ टक्के रुग्ण भारतातील असतात. यामुळे कॅन्सरबाबत अधिक जागरूक असणे व जनजागृती करणे आवश्यक आहे. विदर्भात पुरुषांमध्ये मुखाचा कॅन्सर तर स्त्रियांमध्ये स्तनांचा कॅन्सर पहिल्या स्थानी आहे.

Web Title: world cancer day : Head and Neck Cancer increasing in vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.