जागतिक सेलेब्रल पाल्सी दिवस; ‘त्या’ पंखांना मिळणार स्वावलंबनाचे बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 10:45 AM2018-10-06T10:45:21+5:302018-10-06T10:47:31+5:30
सेरेब्रल पाल्सी अपंगत्वाचे सर्वात मोठे कारण ठरत आहे. जगात जन्माला येणाऱ्या बालकांमध्ये एक हजार बालक सेलेब्रल पाल्सीचे असतात. यावर उपचार नाही. मात्र, ‘फिजिओथेरपी’, ‘आॅक्युपेशनल थेरपी’ व ‘स्पीच थेरपी’ने यांचे जीवन सुसह्य करता येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सेरेब्रल पाल्सी अपंगत्वाचे सर्वात मोठे कारण ठरत आहे. जगात जन्माला येणाऱ्या बालकांमध्ये एक हजार बालक सेलेब्रल पाल्सीचे असतात. यावर उपचार नाही. मात्र, ‘फिजिओथेरपी’, ‘आॅक्युपेशनल थेरपी’ व ‘स्पीच थेरपी’ने यांचे जीवन सुसह्य करता येते.
परंतु अनेक गरजू व गरिबांना ही महागडी उपचार पद्धत परडवत नाही. यामुळे अपंगत्वात वाढ होऊन ही मुले आयुष्यभर दुसऱ्यांवर अवलंबून राहतात. यांना किमान स्वत:ची कामे स्वत: करता यावी, त्यांच्यात स्वावलंबन पेरण्यासाठी एका बालअस्थिरोग तज्ज्ञाने ‘मोफत फिजिओथेरपी’ सेंटर सुरू करण्याचा निर्धार केला आहे. डॉ. विराज शिंगाडे त्या डॉक्टरांचे नाव.
गर्भधारणेच्या कालावधीत आईला ‘इन्फेक्शन’ झाल्यास, रक्तदाब, मधुमेह असल्यास, श्वास घेण्यास किंवा थॉयरॉईड ग्रंथीचा त्रास असल्यास, वेळेआधीच प्रसुती झाल्यास, फार कमी वजनाचे बाळ असल्यास व इतरही काही कारणांमुळे जन्माला येणारे बाळ हे ‘सेरेब्रल पाल्सी’ राहू शकते. विशेष म्हणजे, अलीकडे अयोग्य जीवनशैलीमुळे ही लक्षणे बºयाच महिलांमध्ये दिसून येऊ लागली आहे.
गेल्या पाच वर्षांत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. भारतात २५ लाख लोकं सेरेब्रल पाल्सीने पीडित आहे. सेरेब्रल पाल्सीमध्ये लवकर उपचार सुरू होणे अत्यंत फायद्याचे ठरते. कारण बालवयात मेंदूची लवचिकता व शिकण्याची क्षमता फार चांगली असल्यामुळे त्याचा फायदा होतो. परंतु गरीब व गरजू मुले महागड्या उपचारांपासून वंचित राहतात, त्यांना कष्टमय जीवन व्यतीत करावे लागते. अशा मुलांच्या जीवनात आनंद पेरण्यासाठी, नि:शुल्क ‘फिजिओथेरपी’च्या मदतीने या मुलांना स्वावलंबी बनविण्यासाठी डॉ. शिंगाडे यांनी नागाई नारायण स्मृती फाऊंंडेशनतर्फे हे स्तुत्य कार्य हाती घेतले आहे. अजनी चौकात ‘प्रवरा हॉस्पिटल’मध्ये २० मुलांवरील मोफत उपचारातून सुरुवात झाली आहे.
त्यांना स्वबळ देण्याचा प्रयत्न
गडचिरोलीपासून तर धारणी, मेळघाटातील गरीब व गरजू मुले जी न्यूरॉलॉजिकल कमकुवत व अस्थिव्यंगाच्या व्याधीने ग्रस्त आहेत, त्यांना मोफत औषधोपचार करून त्यांचे अपंगत्व दूर करणे व त्यांनी कुणावरही अवलंबून न राहता इतर सामान्य मुलांसारखे जीवन जगण्यास समर्थ करणे हा नागाई नारायणजी स्मृती प्रतिष्ठान संस्थेचा मुख्य उद्देश आहे. त्याच धर्तीवर आता मोफत फिजिओथेरपी सुरू करून या मुलांंना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न आहे.
-डॉ. विराज शिंगाडे, बालअस्थिरोगतज्ज्ञ, नागपूर.