जागतिक चॉकलेट दिन विशेष : ताण कमी करायचाय? खा, डार्क चॉकलेट !
By सुमेध वाघमार | Published: July 7, 2023 10:48 AM2023-07-07T10:48:19+5:302023-07-07T10:49:02+5:30
हृदय, मेंदूसाठीही फायदेशीर ठरते ‘डार्क चॉकलेट’
सुमेध वाघमारे
नागपूर : चिडचिड, संताप, आदळआपट, नापास होण्याची भीती, पेपर अवघड गेल्याचे शल्य, अपेक्षित गुण नसल्याने आलेला ताण कमी करायचे असेल तर ‘डार्क चॉकलेट’ खा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. डार्क चॉकलेट हे ‘कोको सॉलिड्स’ने समृद्ध असते. यामुळे मेंदू, हृदयाचे आरोग्य चांगले राहते; शिवाय, विशिष्ट कर्करोगास प्रतिबंधही करते.
चॉकलेटचे मर्यादित सेवन करणाऱ्या सुमारे एक लाख लोकांवर ब्रिटिश संशोधकांनी अभ्यास केला. चॉकलेट ‘कार्डियोवेस्क्युलर’ आजारापासून बचाव करण्यासाठी ३७ टक्के आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी २९ टक्के फायदेशीर असल्याचे या संशोधनात आढळले. ‘चॉकलेटच्या अँटिऑक्सिडंट प्रॉपर्टी’ने तणाव नियंत्रणात राहतो. तसेच यामुळे हृदयावर अनावश्यक दबाव पडत नसल्याचेही समोर आले.
डार्क चॉकलेटचे चवीपेक्षा जास्त फायदे
हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अमेय बीडकर यांनी सांगितले, डार्क चॉकलेटचे चवीपेक्षा जास्त फायदे आहेत. डार्क चॉकलेटचे माफक प्रमाणात सेवन केल्याने रक्तप्रवाह वाढवून, रक्तदाब कमी करून आणि रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढवून हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचे आरोग्य सुधारते. चॉकलेटमधील कोकोमध्ये आढळणारे शक्तिशाली ‘अँटिऑक्सिडंट्स’, ‘फ्लॅव्हॅनॉल्स’ची उपस्थिती या फायद्यांमागील प्रेरक असल्याचे मानले जाते.
- स्मरणशक्ती, मेंदूची कार्यक्षमता वाढविण्यास मदत
न्यूरोलॉजिस्ट डॉ. निनाद श्रीखंडे यांनी सांगितले, एका संशोधनानुसार ‘डार्क चॉकलेट’मधील ‘फ्लॅव्हॅनॉल’ हे स्मरणशक्ती आणि मेंदूची कार्यक्षमता वाढविण्यास मदत करते. ‘फ्रंटियर्स इन न्यूट्रिशन’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे दिसून आले की, अल्प कालावधीसाठी उच्च-‘फ्लाव्हॅनॉल कोको’चे सेवन केल्याने आकलनविषयक कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा होते.
‘मूड’वर सकारात्मक परिणाम
मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कनक गिल्लूरकर यांनी सांगितले, डार्क चॉकलेटच्या सेवनाचा ‘मूड’वर सकारात्मक परिणाम होतो. ‘डार्क चॉकलेट’ खाण्याचा आनंददायी अनुभव तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करू शकतो; कारण ते मेंदूतील ‘एंडोर्फिन’ आणि ‘सेरोटोनिन’ सोडते. हे ‘फील गुड केमिकल्स’ म्हणून ओळखले जाते.
व्यायामाची कार्यक्षमता वाढू शकते
चॉकलेट शारीरिक हालचालींसाठी ऊर्जेचा एक मौल्यवान स्रोत म्हणून काम करू शकते. अभ्यासातून असे दिसून आले की, व्यायाम करण्यापूर्वी थोड्या प्रमाणात डार्क चॉकलेटचे सेवन केल्यास व्यायामाची कार्यक्षमता वाढू शकते. परंतु ते मर्यादित खायला हवे. फक्त डार्क चॉकलेट खाणे ही आरोग्यासाठी जादूची गोळी नाही. अतिसेवनामुळे वजन वाढू शकते आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात, अशी चेतावणी डॉ. बीडकर यांनी दिली.