‘ड्रॅगन पॅलेस’ होणार वर्ल्ड क्लास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 09:35 PM2018-10-19T21:35:29+5:302018-10-19T21:41:48+5:30
ड्रॅगन पॅलेसमध्ये बुद्धिस्ट राष्ट्रांतून येणाऱ्या पर्यटकांना बुद्धांच्या जीवनाची माहिती कळण्यासाठी सिंगापूरच्या लाईट व साऊंड शोप्रमाणे एक ‘वर्ल्ड प्राईड सेंटर आॅफ बुद्धिझम’ हा प्रकल्प स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्रीय पर्यटन मंत्र्यालयास एक प्रकल्प प्रस्ताव पाठविला आहे. या प्रकल्पामुळे ड्रॅगन पॅलेस हे केवळ भारतातच नव्हे तर जगात विख्यात होईल. यासाठी या अहवालास मंजुरी देऊन या प्रकल्पाच्या निर्मितीस केंद्रीय पर्यटन मंत्र्यानी सहकार्य करावे, असे केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी सुचविले. यावर केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री के.जे. अल्फॉन्स यांनी ‘ड्रॅगन पॅलेसच्या ‘वर्ल्ड प्राईड सेंटर आॅफ बुद्धिझम’ या प्रकल्पासाठी सुमारे १०० कोटीच्या निधी प्रकल्पाचा डी. पी. आर. (सविस्तर प्रकल्प अहवाल) त्वरित मंजूर करू, असे आश्वासन येथे दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ड्रॅगन पॅलेसमध्ये बुद्धिस्ट राष्ट्रांतून येणाऱ्या पर्यटकांना बुद्धांच्या जीवनाची माहिती कळण्यासाठी सिंगापूरच्या लाईट व साऊंड शोप्रमाणे एक ‘वर्ल्ड प्राईड सेंटर आॅफ बुद्धिझम’ हा प्रकल्प स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्रीय पर्यटन मंत्र्यालयास एक प्रकल्प प्रस्ताव पाठविला आहे. या प्रकल्पामुळे ड्रॅगन पॅलेस हे केवळ भारतातच नव्हे तर जगात विख्यात होईल. यासाठी या अहवालास मंजुरी देऊन या प्रकल्पाच्या निर्मितीस केंद्रीय पर्यटन मंत्र्यानी सहकार्य करावे, असे केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी सुचविले. यावर केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री के.जे. अल्फॉन्स यांनी ‘ड्रॅगन पॅलेसच्या ‘वर्ल्ड प्राईड सेंटर आॅफ बुद्धिझम’ या प्रकल्पासाठी सुमारे १०० कोटीच्या निधी प्रकल्पाचा डी. पी. आर. (सविस्तर प्रकल्प अहवाल) त्वरित मंजूर करू, असे आश्वासन येथे दिले.
कामठी येथील ड्रॅगन पॅलेस परिसरात ओगावा सोसायटीच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट शांतता परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यसभा खासदार डॉ. विकास महात्मे, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्या व ड्रॅगन पॅलेसच्या संस्थापक अॅड. सुलेखा कुंभारे, आंतरराष्ट्रीय महाबोधी मेडिटेशन सेंटर, लेह-लद्दाखचे संचालक भदंत संघसेना याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बुद्धिस्ट माहिती पुस्तिकेचे विमोचनही करण्यात आले.
ड्रॅगन पॅलेसपर्यंत येण्यासाठी आता पुढील काळात मेट्रोचे स्टेशन निर्माण होणार असून त्यांची संरचनाही ड्रॅगन पॅलेससारखीच राहील, अशी माहितीही गडकरी यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. सुलेखा कुंभारे यांनी तर आभार प्रदर्शन नगरसेविका वंदना भगत यांनी केले.
नागपूरची मेट्रो ‘ड्रॅगन पॅलेस’पर्यंत येणार - पालकमंत्री बावनकुळे
नागपूरचे पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर-कन्हान-कामठी हा ३०० कोटी रुपयांचा रस्ता सहा महिन्यात पूर्ण होणार असल्याचे सांगितले. नागपूर मेट्रो ड्रॅगन पॅलेसपर्यंत येणार असून मेट्रोचे सहा स्टेशन्स कामठीत राहतील, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.