‘एम्स’मध्ये सिकलसेल रुग्णांसाठी जागतिक दर्जाची सुविधा
By सुमेध वाघमार | Published: July 11, 2024 05:36 PM2024-07-11T17:36:52+5:302024-07-11T17:37:30+5:30
डॉ. जोशी : बाधितांसाठी ओपीडीमध्ये स्वतंत्र खिडकी
सुमेध वाघमारे
नागपूर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) सिकलसेल अॅनिमिया असलेल्या रुग्णांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सिकलसेलबाधितांसाठी बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) स्वतंत्र विशेष नोंदणी काऊंटर उघडण्यात आले आहे. सोबतच उपचार, औषधांची विशेष सोय सुद्धा सुरू करण्यात आल्याची माहिती ‘एम्स’चे संचालक डॉ. पी.पी. जोशी यांनी दिली.
सिकलसेलच्या रुग्णांसाठी ओपीडीमध्ये विशेष सोयी-सुविधां कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. डॉ. जोशी म्हणाले, या रुग्णांसाठी वॉर्डात काही खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ‘सेंटर आॅफ एक्सलन्स फॉर सिकलसेल अॅनिमिया’च्या विकासासाठी प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. पॅथॉलॉजीच्या विभाग प्रमुख डॉ. रसिका गडकरी यांनी सांगितले की, सिकलसेलच्या रुग्णांसाठी आवश्यक त्या सर्व चाचण्या ‘एम्स’मध्ये उपलब्ध आहेत. सकलसेल रुग्णांमध्ये ‘बोनमॅरो ट्रान्सप्लांट’ला मदत करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेले ‘हेमॅटोपोएटिक स्टेम सेल’ संकलन आणि ‘क्रायोप्रिझर्वेशन’ देखील उपलब्ध आहे. हेमॅटोलॉजिस्ट डॉ विश्वदीप खुशू यांनी सांगितले, ‘बोनमॅरो ट्रान्सप्लांट युनीट’ कार्यान्वित झाल्याने सिकलसेलच्या रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे.
गर्भातच सिकलसेलचे निदान
सिकलसेल अॅनिमियाचे गर्भधारणेच्या पहिल्या तीन महिन्यांत आणि १६ ते २० आठवड्यांत ‘अॅम्नीओसेन्टेसिस’ आणि ‘कोरिओनिक विलस बायोप्सी’ द्वारे सिकलसेल अॅनिमियाचे प्रसूतीपूर्व निदान मोफत करण्याची सोय ‘एम्स’मध्ये उपलब्ध आहे. मोफत समुपदेशन सेवाही सुरू करण्यात आली आहे. विवाहपूर्व समुपदेशनासाठी, जनजागृती आणि स्क्रीनिंगसाठी नियमित कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात येणार असल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले. कार्यक्रमाला वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार, डॉ मीनाक्षी गिरीश, डॉ अमोल दुबे, डॉ ऋचा जुनेजा, डॉ नितीन मराठे, डॉ मेधा डविले, डॉ मीना मिश्र, डॉ अमोल डोंगरे, डॉ आकाश बंग आदी उपस्थित होते.